रोहणा : गतवर्षी खरीप रोजी झालेल्या अतवृष्टीत स्थानिक भोलेश्वरी नदीच्या काठावरील अनेक शेतकर्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या. यातील अनेक शेतकर्यांना शासनाकडून अद्यापही कोणतेच अर्थसहाय्य मिळालेले नाही. लवकरच निधी मिळेल अशी आश्वासनांची खैरात मात्र सुरूच आहे. जमीन खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना व त्यानंतर झालेल्या गारपीटग्रस्तांना हेक्टरी भरीव अनुदान शासनाकडून जाहीर झाले आहे. पण खरडून गेलेल्या जमिनीचे अनुदान अजूनही शेतकर्यांना मिळाले नाही. नुकतीच रोहणा येथील काही पीडित शेतकर्यांनी आर्वी उपविभागीय अधिकार्यांची भेट घेतली असता शासनाकडून अनुदान आल्यावर तुम्हाला देवू असे वेळ काढू आश्वासन दिले. गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कित्येकांची घरे जमीनदोस्त झाली. जनावरे वाहून गेली. जीवनोपयोगी साहित्य खराब झाले. शेतातील पिके खराब झाली. रोहणा येथील भोलेश्वरी नदीला कधी नव्हे एवढा प्रचंड पूर आला. या पुरात १00 ते १५0 शेतकर्यांच्या हजारो हेक्टर जमिनीतील नुसती पिकेच नाही तर पिकांसह संपूर्ण शेतजमीन वाहून गेली. नदीतील रेती व दगड शेतात येऊन साचले. अनेकांची शेत कुंपणे, ठिंबक सिंचन साहित्य व स्प्रिंकलर संच वाहून गेले. यातील अनेक शेतजमीन आजही शेती करण्यास उपयुक्त नाही. अशा जमीन खरडून गेलेल्या शेतकर्यांना प्रति हेक्टर रुपये २५ हजार व कमाल र्मयादा दोन हेक्टरची असेल याप्रमाणे अनुदान मिळेल असे शासनाने जाहीर केले व अशा खरडून गेलेल्या शेत जमिनीचा महसूल विभागाने सर्व्हेदेखील केला. त्यानंतर सर्वसाधारण नुकसानग्रस्तांना शासनाचे अनुदान मिळाले. जनावरे वाहून गेली अशा नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली. घरे पडली किंवा जीवनोपयोगी वस्तू खराब झाल्या अशा पीडितांनाही शासनाने आणि काही स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी आर्थिक मदतीचे वाटप केले. पण ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या अशा पीडितांना शासनाची मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी मध्ये व त्यानंतरही झालेल्या गारपीट ग्रस्तांना शासनाने भरीव मदत दिली. जेथे गारपीट झालीे त्या भागातील शेतकर्यांबरोबर गारपीट न झालेल्या भागातील शेतकर्यांनादेखील शासनाने भरीव आर्थिक मदत देवून त्यांच चांगभलं केले. मग या खरडून गेलेल्या शेतजमीनधारकांना अजूनपर्यंंत का मदत मिळाली नाही, हा प्रश्न बर्याच दिवसांपासून शेतकर्यांना सतावत आहे. रोहणा येथील पीडित शेतकरी संजय रणनवरे यांच्या नेतृत्वात अंदाजे ५0 शेतकर्यांनी आर्वी येथे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन आपली कथा सांगितली. लेखी निवेदनही दिले. पण त्यांनी शासनाकडून अनुदान राशी आल्यावर त्वरीत आपल्याला वाटू असे वेळकाढू आश्वासन देऊन वेळ निभावून नेली पण शेतकरी आर्थिक संकटात असल्याने व पुढचा खरीप येऊन ठेपल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मदत मिळाल्यास खरिपातील बियाणे खरेदी करण्यासाठी हातभार लागला असता. पण निधी न मिळाल्याने शेतकरी आशेवर आहे.(वार्ताहर)
अतवृष्टीग्रस्तांवर आश्वासनांचीच खैरात
By admin | Updated: June 2, 2014 01:39 IST