आकोली : शासकीय नियमाप्रमाणे निश्चित अवधीनंतर कर्मचाऱ्यांची बदली होत असते. परंतु सेलू तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी व कृषी पर्यवेक्षक संघटनेचे सचिव एम.जे. हनवंते हे थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल २४ वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. यात त्यांची पदोन्नतीही झाली; त्यांची बदली मात्र झाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी बदलीपात्र यादीत त्यांचे नाव असते; परंतु वेळेपर्यंत ते कसे व कुठे गहाळ होते, ही बाब गुलदस्त्यातच आहे.एम.जे.हनवंते हे १९९० मध्ये सेलू तालुका कृषी कार्यालयात रूजू झाले. ३० जून १९९८ पर्यंत ते त्याच पदावर कार्यरत होते. अशात कृषी विभागाची एक खिडकी योजता सुरू झाली. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जुले १९९८ पासून ते ६ आॅगस्ट २००७ पर्यंत या योजनेत याच कार्यालयात कार्यरत होते. यानंतर त्यांनी ७ आॅगस्ट २००७ रोजी कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झाली. पदोन्नती झाल्यावर त्यांची बदली होणे अपेक्षीत असताना त्यांना पुन्हा त्याच कार्यालयात ठेवण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे सहा वर्ष पूर्ण झाले की, बदली करणे अनिवार्य होते. प्रत्येकवेळी बदलीपात्र यादीत नाव राहत होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकवेळी बदली टळली. २४ वर्षांच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाहेर सुद्धा जावे लागले. हनवंते यांची बदली मात्र झाली नाही. त्यामुळे कर्मचारीवर्गात नाराजीचा सुरू आहे.शासनाने तयार केलेले कायदे शासनच पायदळी तुडवत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक ते मंडळ अधिकारी असा थक्क करणारा बढतीचा प्रवास एकाच कार्यालयात घडल्याचे कदाचित हे राज्यातील दुर्मीळ उदाहरण असावे.(वार्ताहर)
कृषी अधिकारी २४ वर्षांपासून एकाच ठिकाणी
By admin | Updated: August 4, 2014 23:53 IST