दप्तराच्या वजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष पुलगाव : शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. डिजिटल शिक्षणाकडे सर्वांचा कल आहे. यामुळेच आज सर्वत्र ई-लर्निंगची संकल्पना उदयास येत आहे. यातूनच शासनाच्यावतीने दप्तरमुक्तीचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय असला तरी यावर जिल्ह्यात कार्यवाही होत नसल्याचे शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या ओझ्यावरून दिसत आहे. पुर्वीच्या शिक्षणात इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, भुगोल, इतिहास इत्यादी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश होता. त्यामुळे शिक्षकांना शिकवितांना व विद्यार्थ्यांना शिकतांना त्रास होत नव्हता. तसेच दररोजच्या तासिकाप्रमाणे अभ्यासक्रमाचे नियोजन केल्या जात होते. त्यामुळे नेमकी पुस्तके वह्या विद्यार्थी आणत होते. सप्ताहातून एक दिवस गृहपाठ किंवा पाठातंर होत असे. डिसेंबर, जानेवारी पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानंतर त्याची उजळणी केली जात होती. आज परिस्थिती बदलल्याने बाजारपेठेत सर्व अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके, मार्गदर्शिका, गृहपाठ, स्वाध्याय, वह्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे कित्येक संस्थातून विद्यार्थ्यांचे अभ्यास पूर्ण होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल, मार्गदर्शक पुस्तिका व शिकवणी वर्गाकडे झाला. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारा विद्यार्थी दैनंदिन अभ्यासक्रम शाळेत करून शिकवणी वर्गाकडे जावू लागला. त्यामुळे स्वाभाविकच अभ्यासक्रमाची पुस्तके, वह्या गृहपाठ यासह शिकवणी वर्गाच्या वह्यांचे ओझे दप्तारात भरून शाळेत जाऊ लागले. पर्यायाने शासनाने काढलेल्या आदेशाला तिलांजली मिळाली व विद्यार्थी पुस्तक व दप्तराच्या ओझ्याखाली दबू लागला. शिक्षण पद्धत बदलली पूर्वी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून समाजसेवी संस्थाकडून शिक्षण संस्था चालविल्या जात होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याकरिता तशा शिक्षकांची नियुक्तीही होत होती. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणही मिळत होते. या शिक्षणाकरिता पाठ्यपुस्तक आणि वर्गपाठ वही इतकेच साधन आणि माध्यम होते; परंतु आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात व अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल झाला. नव्या अभ्यासक्रमावरील विविध प्रकारची मार्गदर्शिका, गृहपाठ अशी पुस्तक व्यवस्था उदयास आली. पुस्तकी ज्ञानाच्या बाजारामुळे विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या मार्गदर्शिका स्वाध्याय पुस्तिका वह्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढु लागले. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
शासन निर्णयानंतरही विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच
By admin | Updated: August 5, 2016 02:02 IST