नोटीस जारी : निर्मल भारत अभियानघोराड : निर्मल भारत अभियानांतर्गत ज्या गावात योजनेची उद्दिष्टपूर्ती झाली नाही तेथील प्रशासनावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या नोटीसबाबत नागरिकांत संभ्रम आहे.सेलू येथील पंचायत समिती कार्यालयात सूचना फलकावर ही नोटीस न लावता या आशयाचे पत्र पं. स. कार्यालयाच्या व्हऱ्हांड्यात लावण्यात आले आहे. योजनेंतर्गत जेथे शौचालय बांधकाम झाले नाही तेथील ग्रामपंचायत सचिवावर कारवाई होणार असे संकेत आदेशातून देण्यात आले आहे. त्यामुळे या नोटीसकडे सर्वांचे लक्ष जात असून हे पत्र सार्वजनिक करण्यामागच्या नेमका हेतू काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.निर्मल भारत योजनेअंतर्गत जून २०१४ पर्यंत गावातील शौचालयाच्या बांधकामाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करावयाचे होते. पण २६ जून २०१४ ला पंचायत समितीने क्र./पं. स से/ पंचायत/स्था-१/कावि १०५१/२०१४ या क्रमाकांचे पत्र जारी केले. त्यानुसार शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा घरभाडे भत्ता थांबविण्यात येणार आहे. तर १ जुलै २०१४ ची वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्याची कारवाई होणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. या आशयाचे पत्र तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.(वार्ताहर)
योजनेची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई
By admin | Updated: July 5, 2014 23:45 IST