रसुलाबाद : स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत अध्यक्ष पदावरून वाद झाला. यामुळे कोरम असताना सभा रद्द करण्यात आली. ती ठरल्याप्रमाणे मंगळवारी घेण्यात आली. मागील सभा वादग्रस्त ठरल्याने जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सभा झाली. यातही अध्यक्ष पदाचा मुद्दा गाजला; पण जनमत घेत निवड केली. यानंतर शांततेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. मागील सभेप्रमाणेच पुन्हा अध्यक्षाचा मुद्दा ऐरणीवर आला. कुणाचेही एकमत होत नव्हते. अखेर ग्रामस्थांचा कौल आजमावून अध्यक्षाची निवड करण्याचे ठरले. याप्रमाणे प्रयत्न केले; पण त्यातही यश आले नाही. यामुळे सभेत कल्लोळ माजला. सत्तापक्ष आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध पेटले. यातच विरोधाभास करणारे शेकडो नागरिक सभेतून निघून गेले. यानंतर उर्वरित नागरिकांनी हरिश्चंद्र हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली. सभेत ग्रामसेवक रामटेके यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज तसेच शासकीय योजनांची उपस्थितांना माहिती देऊन सभेला सुरूवात केली. यावेळी गावातील सिमेंट रस्ते, नाल्यांचे बांधकाम आणि पाणी पुरवठ्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेमध्ये नागरिकांना नवीन भूखंड मिळण्याबाबत प्राप्त झालेल्या अर्जांचे वाचन करण्यात आले. शिवाय घरकूल, बैलबंडी, शेतीपयोगी अवजारे मिळण्याकरिता उपस्थितांनी दिलेल्या अर्जांचाही यावेळी स्वीकार करण्यात आला. सभेला सरपंच राजेश्री धारगावे, उपसरपंच विलास खडके, सदस्य विजय सावरकर, नितीन धाडसे, महिला सदस्य रघाटाटे, मानकर, ढोले, उईके, गवारले व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य नारायण कुऱ्हेकर व ग्रा.पं. सदस्य सय्यद हनिफ हे सभेपूर्वी वाद झाल्याने निघून गेले. एकंदरीत कल्लोळाने सुरू झालेल्या ग्रामसभेत समाधानकारक चर्चा करण्यात आली.(वार्ताहर)
तहकूब ग्रामसभेतही गाजला अध्यक्षाचा मुद्दा
By admin | Updated: August 27, 2015 02:25 IST