अ. मु. चांदेकर : आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकाराच्या वेळ व पैश्याची बचत वर्धा : येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल ३३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २३९ प्रलंबित प्रकरणे आणि दखलपूर्व वादाच्या ९० प्रकरणांचा समावेश आहे. तडजतोडीने सोडविण्यात आलेल्या या प्रकरणांचे मूल्य ७३ लाख ६७ हजार ८६६ एवढे असल्याची माहिती जिल्हा न्याय व प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे. आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष अ. मु. चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व दिवाणी न्यायाधीश, शासकीय अधियोक्ता, जी. व्ही. तकवाले, अधियोक्ता संघाचे अध्यक्ष अमोल कोटंबकर व सदस्य, न्यायालय व्यवस्थापक सुनील पिंपळे, विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजुरकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश चांदेकर म्हणाले, राष्ट्रीय लोक अदालतीमार्फत आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होऊन मानसिक समाधान मिळते. आपसी समझोत्यामुळे तडा गेलेल्या मनांना जोडण्याचा प्रयत्न लोक अदालतच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पारिवारीक व सामाजिक स्रेह वाढतो. यावेळी जी. व्ही. तकवाले, सु. ना. राजुरकर यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. संचालन सहन्यायाधीश स.मो. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला अधिवक्ता समाजसेवक आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ३३२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली
By admin | Updated: February 16, 2017 01:20 IST