लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मागील सात दिवसांत विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात तब्बल ३३ व्यक्ती परतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रकाराची एन्ट्री झाली असली, तरी वर्धा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. असे असले तरी ओमायक्रॉनला वेळीच ब्रेक लावण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेत त्यांची कोविड टेस्ट करून त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे. विदेशवारी करून परतलेले तब्बल ३३ व्यक्ती जिल्हा प्रशासनाने ट्रेस करून त्यांची कोविड चाचणी केली असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते सध्या विलगीकरणात आहेत.
दिल्ली, मुंबई अन् हैदराबाद होत पोहोचले वर्धाविदेशवारी करून परतलेल्या ३३ व्यक्तींपैकी काही व्यक्ती दिल्ली, मुंबई तर काही हैदराबाद येथील विमानतळावर उतरलेत. त्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा गाठल्याचे सांगण्यात आले.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग वॉच ठेवून आहे. नागरिकांनीही विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची माहिती स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला देऊन सहकार्य करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
सहा व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब- विदेशवारी करून परतलेल्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे विलगीकरण कालावधीतील पाचव्या व दहाव्या दिवशी या व्यक्तींचे पुन्हा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे क्रमप्राप्त आहे. - शासनाच्या याच सूचनेनुसार विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
विदेशातून परतलेल्यांत पुरुष सर्वाधिक- विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांची संख्या सध्या ३३ असून यात ११ महिला, तर २२ पुरुषांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. - या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.