घोराड : खरीपात मक्त्याने शेती केली. वाटलं होत काही तरी उत्पन्न होईल. यात पाच एकरापैकी तीन एकरात सोयाबीनचा पेरा केला. पेरलेली बियाणे उगवलही, डवरणीही अन् फवारणी केली. यात निसर्गाची अवकृपा झाली. पाहता पाहता सवंगणीची वेळ आली. सवंगणीच्यावेळी हाती-काहीच येणार नसल्याची खात्री झाल्याने अखेर वखरणीच करावी लागल्याने कोलगाव येथील शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. कोलगाव शिवारातील पाच एकर शेती ३० हजार रुपयांत मक्त्याने करून चांगले उत्पन्न घेण्याच्या रघुनाथच्या प्रयत्नाला तडा गेला आहे. पाच एकर शेतीपैकी तीन एकरात सोयाबीनचा पेरा केला. २०० किलो बियाण्याची पेरणी केली, सोयाबीन उगवले, वाढूही लागले. यामुळे त्याच्या आशा पल्लवित होवू लागल्या. यात तणनाशकाच्या फवारणीवर दोन हजार ५०० रुपये खर्च केले. १४ हजाराचे बियाणे, पेरणीचा, डवरणीचा खर्च चार हजार रुपये आणि तीन एकर शेतीचा ठेका १८ हजार रुपये. यात असा एकूण ४० हजारांचा खर्च झाला. सोयाबीनला शेंगा लागल्या. त्यातील दाणे भरत असतानाच माकडाने हैदोस घालणे सुरू केले. अशात पावसाने मारलेल्या दडीमुळे हजारो रुपयांच्या खर्चावर विरजण पाडून गेली. जेमतेम रोजमजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत असताना दोन पैसे अधिक कमवावे ही आशा निराशेत बदलल्याने आता उर्वरीत दोन एकरात कपाशीचे पीक आहे. दरामुळे त्याचीही आशा मावळली आहे. (वार्ताहर)
२०० किलो बियाणे पेरले, पण पसाभरही उत्पन्न नाही
By admin | Updated: November 16, 2014 23:09 IST