नीलिमा कुलकर्णी , आनंद निकेतन, नाशिक. 16 मार्च 2020 रोजी शाळा बंद झाली. उरलेले 15 दिवस परीक्षा होईल या आशेने ठरवलेला अभ्यासक्रम व्हॉटसऐपवर व्हिडिओज किंवा सरावाच्या वर्कशीट्स पाठवून पूर्ण केला. मुलांनीही उत्सुकतेने नवीन माध्यमांचा आधार घेत अभ्यास केला. या काळात अभ्यास करताना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली मुलांकडून भरून घेतली, त्यातून आम्हालाही बरेच शिकायला मिळाले. ऑनलाईन शिक्षणाचा साधकबाधक विचार करता जास्तीत जास्त ऑफलाईन शिक्षण कसं चालू राहील याचा विचार आम्ही करत होतो.स्वयं प्रेरणोने मुलं शिक्षक नसतानाही काय काय शिकू शकतात याचा विचार करत असताना ‘कर के सीखो’ या प्रकल्पाची नवीन कल्पना आकार घेऊ लागली. कोविड काळातली अपरिहार्यता स्वीकारून त्याकडे एक संधी म्हणून पहायचे आम्ही ठरवले.मुले स्वत:हून काय शिकतात,त्यांची प्रेरणा कशात आहे, त्यांच्या आवडीच्या विषयात झोकून देऊन काम करू शकतात का ,गरज पडल्यास कुणाची मदत घ्यायची ते ठरवू शकतात का हे शोधण्याची हीच योग्य वेळ होती. नाहीतरी शाळेत प्रत्येकाच्या आवडीनुसार,क्षमतेनुसार ,गतीनुसार शिकवणो शक्य होते का? विषयांची चौकट व काही बंधने असतातच! या प्रकल्पात मुलांनी आपल्या आवडीचे विषय निवडून,ठरवलेला साचेबद्ध अभ्यासक्रम नसताना स्वत:च शिकणो अभिप्रेत होते.नमुन्यादाखल काही विषय येथे देत आहे. उदा. निसर्गातील एखाद्या सजीवाच्या हालचालीचा अभ्यास, एखादे तत्व वापरून वैज्ञानिक खेळणी बनवणो, घराचे बजेट समजून घेणो, कमी करणो,नवीन भाषा शिकणो इ.