सारखं काहीतरी शिकायचा जाम कंटाळा येतो ना? सध्या तुम्ही मुलं आणि तुमचे आईबाबा सगळेच घरात आहेत. आईबाबांना वाटतं मुलांचा वेळ कसा जाणार मग ते सारखं हे शिक ते शिक करत मागे लागतात. काहीवेळा अभ्यासाचं काहीतरी शिकायला सांगतात नाहीतर इतरही काहीबाही गोष्टीही सांगतात शिकायला. पण त्याचा ही कंटाळा येतोच ना! पालकांना सांगितलं असं सतत काहीतरी शिका, समजून घ्या तर आवडेल का? नाही ना! मग?बरं ते जाऊ द्या, तर आज तुम्हाला एका भन्नाट युट्युब चॅनलची माहिती देणार आहे. फुल टाईमपास. तुम्हाला कुकिंग आवडतं? घाबरू नका, तुम्हाला काहीही बनवायचं किंवा बनवायला शिकायचं नाहीये. तुम्हाला फक्त बघायचं आहे. tasty नावाचा एक प्रसिद्ध युट्युब चॅनल आहे. त्यांनी मध्यंतरी एक सिरीज प्रकाशित केली. फार मस्त कल्पना आहे बरं का त्याची! यात एक मुलगा/मुलगी त्याच्या/तिच्या डोक्यातलं एखादं चित्र कागदावर काढतो. आणि टेस्टीचे दोन शेफ्स ते चित्र त्यांच्या पदाथार्तून तयार करतात. यात दोन्ही शेफ्समध्ये स्पर्धा असते. चित्र निर्माण करतात म्हणजे काय तर मुलांनी जे काही काढलंय, त्यातले आकार, रंग यांचा वापर करून पदार्थ बनवतात. काही वेळा मुलांच्या डोक्यात एखादा पदार्थच असतो. तो ते कागदावर त्यांच्या पद्धतीने काढतात आणि शेफ्स त्यापासून झक्कास असा पदार्थ तयार करतात. मग दोन्ही शेफ्सनी बनवलेले पदार्थ त्या मुलाला/मुलीला खायला देतात आणि तिला जो पदार्थ आवडले तो शेफ जिंकला. पदार्थ देताना कुठला कुणी केलाय हे मात्र सांगितलं जात नाही. जेव्हा मुलं रिझल्ट सांगतात तेव्हाच कुठल्या शेफने कुठला पदार्थ बनवलेला आहे हे मुलांना कळत. आहे की नाही धमाल.