ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक तलाव एकामागून एक नामशेष होऊ लागल्याने तलावांची नेमकी व्याख्या पुढे आली आहे. अनेकांनी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाचविण्याचे आवाहन महापालिकेसह सामाजिक संस्थांना केले आहे.तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच तलाव शिल्लक राहिले आहेत. आजच्या घडीला ६५ पैकी केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत. जे आहेत, त्यावर महापालिका लाखो रुपयांचा निधी खर्च करते. शहरातील तलावांचे सुशोभिकरण करताना त्यांचे कॉक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे त्याला कळत नकळत एखाद्या टँकचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे. जर तलाव टिकवायचे असतील तर येथे लोकांचा वावर किती आहे? याबाबत दरवर्षी तलावांचे आॅडिट होणे गरज आहे. तसेच तलावांत विविध माध्यमातून होणाऱ्या प्रदूषण लक्षात घेता त्याची वारंवार तपासणी होणेही तितकेच गरजे असल्याचे बोलले जात आहे. शहरातील कोलबाड, सिद्धेश्वर, मांसुदा, कचराली तलाव आदी दिसणाऱ्या तलावांचे सुशोभिकरण करताना लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, या खर्चानंतर त्याचे टँकमध्ये रुपांतर होते. याउलट तलाव म्हणजे गावांमध्ये दिसणारे जिथे नैसर्गिकरित्या असलेले चिखल, गवत आणि स्वच्छ पाण्यात आपली तृष्णा भागविण्यासाठी कलबिलाट करणारे विविध पक्षी येणे गरजे आहे. मात्र, कावळ्यांना आणणे म्हणजे तलाव होत नाही. याबाबत तलावांचे सुशोभिकरण करणाऱ्या संस्थांनी काळजी घ्यावी. त्यातूनच किमान त्यांचा जिर्णोद्धार होऊन ठाणेकरांसाठी ते पिकनिक स्पॉटसाठी अथवा विरंगुळ्यासाठी उपलब्ध होईल असेही सूर आता ठाणेकरांमध्ये उमटू लागले आहेत. (प्रतिनिधी)
तलाव म्हणजे नक्की काय?...
By admin | Updated: September 25, 2015 02:17 IST