- रामदास खरे‘काव्य सीता’ या पुस्तकात नामवंत कवींविषयी तर ‘मृण्मयी’ या काव्यसंग्रहाचे संपादन... अनंत काणेकरांच्या ‘चौकोनी आकाश’ या कवितासंग्रहाचे संपादनही त्यांचेच. याशिवाय कवींवर लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांतून ‘गीतभान’ हे पुस्तक साकारणारे प्रख्यात कवी, समीक्षक, संशोधक, आस्वादक म्हणजे प्रा. रमेश तेंडुलकर. अर्थात सचिनचे वडील...ध्येय हवे ध्येय हवे, ध्येयाची ओढ किती तोडवे न पण जीवा, पाशांची आसक्ती! ध्येय हवे पाश हवे! आयु हवे मरण हवे! नकळे, वेड्या जीवा! काय तुझी गत पुढती! (मानस-लहरी, कवितासंग्रह) उपरोक्त काव्यपंक्ती आहेत प्रख्यात कवी, समीक्षक, संशोधक, आस्वादक प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या. आता प्रा. रमेश तेंडुलकर म्हंटले की अपरिहार्याने सचिनचे नाव जोडले जाणारच. लहानपणी सचिनची ओळख ‘हा प्रसिद्ध कवी आणि प्राध्यापक रमेश तेंडुलकरांचा मुलगा’ अशी करून दिली जायची. अल्पावधीतच सचिनने जी काही अफलातून बॅटिंग केली ती सर्वांना सर्वश्रुत आहेच. तीच ओळख पुढे ‘हे आपल्या सचिन तेंडुलकरांचे बाबा... बरं का?’ अशी केली गेली. त्याचा रास्त अभिमान कविराजांना होता. ‘आपण एका महान कवीचे पुत्र आहोत’ असा रास्त अभिमान सचिनलादेखील आहे. इतका मोठा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा खेळाडू असूनही सचिनचे पाय अजूनही जमिनीवर असण्याचे एकमेव कारण म्हणजे कवी रमेश तेंडुलकरांचे उत्तम संस्कार. सचिनच्या सर्वांगात भिनलेल्या क्रिकेटला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. संवेदनशील कवीमन लाभलेल्या कवी रमेश तेंडुलकरांचा जन्म १८ डिसेंबर १९३०चा. बी.ए.मध्ये तर्खडकर सुवर्णपदक तर एम.ए.मध्ये देखील न. चि. केळकर सुवर्णपदक. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ सी.आय.डी.सारख्या विभागात काम केले; पण लवकरच पुढे मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि नंतर कीर्ती कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथील वाङ्मयीन वातावरण, अनेक दिग्गज कवी-लेखकांचा सहवास त्यांना आवडू लागला. याच काळात त्यांच्या प्रतिभेला बहर येऊन काही सकस असे कवितालेखन घडू लागले. त्यांच्या कविता ‘सत्यकथा’सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. एकीकडे कवितालेखन करीत असतानाच त्यांच्यातील समीक्षकदेखील जागा होऊ लागला. मराठी साहित्यविश्वातील एक चतुरस्त्र समीक्षक असे वाचक-रसिक त्यांना संबोधू लागले. अनेक पुस्तकांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या आहेत. ‘आठवणीतील कविता’च्या चार खंडांच्या प्रकाशनाची कल्पना तेंडुलकरांचीच. तेंडुलकर हे मराठी विषयासाठी पी.एचडीचे उत्तम गाईड होते. मराठी संशोधन मंडळाचे ते संचालकही होते. कवी मोठा की गीतकार? हा वाद सर्वश्रुत आहे. त्यावर तेंडुलकरांचे भाष्य महत्त्वाचे आहे. ते म्हणतात. ‘कवितेत कवी हा केंद्रस्थानी असतो व गीतरचनेत लोकमानस केंद्रस्थानी असतो.’ रमेश तेंडुलकरांची ग्रंथसंपदा : कविता संग्रह: मानस-लहरी, प्राजक्त. संपादित ग्रंथ : चौकोनी आकाश (अनंत काणेकरांच्या कविता), कविता दशकाची (१९८०च्या दशकातील महत्त्वपूर्ण अशा दहा कवींच्या कवितांचे संपादन), मृण्मयी (इंदिरा संत यांच्या निवडक कविता), मराठी संशोधन खंड - १३ व १४, आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४), मराठी रोमँटिक काव्यप्रतिभा. संपादन : सहवासातील साहित्यिक, बालकवींची कविता : तीन संदर्भ, (तेंडुलकरांच्या आईचे माहेरही खानदेशातले, बालकवींच्या परिसरातलेच असल्याने बालकवींबद्दल त्यांना विशेष ममत्व आणि आत्मीयता होती.) प्रा. रमेश तेंडुलकरांच्या एकूण कवितालेखनावर डॉ. विजया राजाध्यक्ष म्हणतात, ‘हा कवी निसर्गाशी तन्मय झालेला होता; लौकिक जीवनाचे रागरंगही त्याने न्याहाळले होते. इतकेच नव्हे तर त्यांचा आपल्या परीने अन्वयार्थही लावला होता. तो प्रेमानुभवातील वेगवेगळ्या छटा स्वत:शीच उलगडू पाहत होता, समांतरपणे आत्मशोधही घेत होता. असे पेड एकमेकांत गुंतले, रंग एकमेकांत मिसळले-आणि या कवीच्या आकाशात एक इंद्रधनूची कमान उमटली. ती स्वत:साठी नव्हती. स्वत:साठी उरी शाप घेतले होते; ते सोसण्याचा निर्धार होता. आसवे डोळ्यांत लपवायची होती आणि प्राक्तनाला प्राजक्ताची एक ओंजळ वाहायची होती. आज मला प्राजक्ताभोवती ती इंद्रधनूची कमान उमटल्याचा भास होतो आहे. हा प्राजक्त कदाचित काल लावलेला; पण त्याचा बहर आजचा, गंधही आजचा. तो मला प्रसन्न करतो आणि माझ्या डोळ्यांत एखादा अश्रूही आणतो.’ काही वर्षांपूर्वी म्हणजे तेंडुलकर गेल्यावर मुंबईत त्यांच्या ‘भावमुके’ या कवितासंग्रहाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन दिमाखदार झाले होते. त्यावेळी सचिनचे जागवलेल्या बाबांच्या आठवणी सर्वांच्याच स्मरणात असतील. १९९८मध्ये प्रा. तेंडुलकरांच्या साहित्यप्रवासावर एक सुंदर कार्यक्रम ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात झाला होता. त्यांच्या कवितावाचनाचा कार्यक्र मही झाला. तेव्हा मुद्दाम त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो. माझ्या संग्रही प्रा. तेंडुलकरांचे दि. २९ नोव्हेंबर १९९८चे एक दुर्मिळ पत्र आहे. १८ मे १९९९. सारंच अतर्क्य. सचिनचे लाडके बाबा हार्टअटॅकने गेले तो दिवस. नेमक्या त्याचवेळी सचिन इंग्लंडमध्ये वर्ल्डकप खेळायला गेला होता. बाबांची बातमी समजल्यावर त्याचसरशी तो मुंबईला तडक निघून आला. मात्र आईने त्याला समजावले. कर्तव्याची जाणीव करून दिली. भल्यापहाटे बाबांचा अंत्यविधी आटोपून तो पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. अवघ्या पाचिदवसांनी सचिनने बाबांचे दु:ख उराशी बाळगून ब्रिस्टॉल येथील केनियाविरु द्ध निर्णायक खेळी केली. नाबाद १४० धावा केल्यानंतर त्याने आभाळाकडे पाहिले, वडिलांची वात्सल्य मूर्ती त्याला आशीर्वाद देण्यासाठी आसुसलेली एखाद्या नि:शब्द कवितेसारखी!!
आस्वादक संशोधक
By admin | Updated: February 5, 2017 03:11 IST