ठाण्यातील भिवंडी परिसरात बडोदी गावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ रविवारी सकाळी एका नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासला सुरुवात केली. बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून झाला असावा, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरातील बडोदी गावात रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रहिवाशांना नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
नारपोली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ९४ (मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पुढे सरकताच अधिक तपशील उघड होतील.