ठाणे : कळव्यातील रेतीबंदर परिसरात एका झाडाची फांदी तुटून रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अब्दुल शेख (४२, रा. भिवंडी) हा जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
कळवा येथील पारसिकनगर सर्कलजवळील अमित गार्डन हॉटेलसमोर एका झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर तुटून पडली. या वेळी रिक्षा चालक शेख यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला किरकोळ जखम झाली असून, त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी फांदी हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.