बदलापूर : बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक वसाहतींमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू केले. पंचनाम्यानंतर नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. पुरानंतर केवळ पंचनामे होतात, मदत मिळत नाही, असा आरोप रहिवाशांनी केला.
उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे बदलापूर शहरातील किनाऱ्यालगत असलेल्या अनेक वसाहतींत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यात नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. आज या भागाची अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीची सविस्तर माहिती नोंद करून घेतली. २०१९ मध्ये अशाच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे केले. परंतु अनेक नागरिकांना आर्थिक मदत मिळाली नाही. मात्र किमान या वर्षी तरी नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा पूरग्रस्तांनी व्यक्त केली.
बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा, वालीवली परिसरातील अयोध्यानगरी या गृहसंकुलातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. सकाळी या गृहसंकुलातील घरांची अधिकाऱ्यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. मात्र पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागातील पूरग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली.
.............
वाचली