उल्हासनगर : नगरविकास विभागाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये पालिका सभागृह व विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुका बदलण्याचे आदेश महापौरांना दिले आहेत. मात्र, ५ महिने लोटल्यानंतरही या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने महापौरांवर कारवाईची शक्यता आहे.उल्हासनगर पालिका सभागृह नेते राम चार्ली व विरोधी पक्षनेते नरेंद्र कुमारी ठाकूर यांच्या नेमणुकीला कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षाचा गटनेताच विरोधी नेता तर सत्ताधारी पक्षातील मोठ्या पक्षाचा गटनेता सभागृह नेता असल्याचा आक्षेप आयुक्ताकडे त्यांनी घेऊन दोन्ही नेमणुका रद्द करण्याची मागणी केली. आयुक्त मनोहर हिरे यांनी विधी विभागाचा अभिप्राय घेऊन महापौर अपेक्षा पाटील यांना दोन्ही नेमणुका रद्द करण्याचे सुचविले होते. मात्र, महापौरांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर संघटनेने मुख्यमंत्री व नगरविकास विभागाकडे दाद मागितली. नगरविकास विभागाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये महापौर अपेक्षा पाटील यांना आॅगस्ट महिन्यात पत्र पाठवून दोन्ही नेमणुका रद्द करण्याचे आदेश दिले. ५ महिन्यांच्या कालावधीनंतरही महापौरांनी कारवाई केली नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. महापौरांनी दोन्ही पदांच्या नेमणुकीवर कोणतीच कारवाई केली नाही. याबाबतचा अहवाल आयुक्तांनी शासनाला पाठविण्याची मागणी संघटना करणार आहे. पालिकेवर शिवसेना-भाजपा, रिपाइं व अपक्ष यांची सत्ता असली तरी महासभेत सेनेविरोधात भाजपा असे चित्र आहे.
उल्हासनगर महापौरांवर कारवाईची शक्यता
By admin | Updated: January 11, 2016 01:50 IST