कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी आयुक्त प्रयत्न करीत असतील तर त्यांच्या पाठीशी सरकार आहे. त्यांची बदली कशी करणार, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले सहकारी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना टोला लगावला. सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील बाब असून आमच्या मंत्रिमंडळातील कुठल्याही मंत्र्यांनी आयुक्तांच्या बदलीची मागणी केल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही, असेही ते म्हणाले.येथील स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कारवाई केल्याप्रकरणी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरील शब्दांत मेहता यांना टोला लगावला. प्रकाश मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये येऊन आयुक्तांच्या अतिक्रमणविरोधी कारवाईला जाहीर विरोध केला होता.स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या दुकानांवर आयुक्तांनी बेधडक कारवाई सुरू केली. त्या वेळी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी बंदोबस्त मागे घेतला. त्यानंतर, गृहनिर्माणमंत्री मेहता यांनी आयुक्तांच्या बदलीची मागणी केल्याची चर्चा रंगली होती. येथील सनई मंगल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मुद्रा या योजनेचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुनगंटीवारांचा मेहतांना टोला
By admin | Updated: January 11, 2016 01:51 IST