कल्याण : करवसुलीत टाळाटाळ केल्याप्रकरणी मागील आठवड्यात केडीएमसीचे ‘क’ प्रभागातील करअधीक्षक चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ लिपिक मंगला पाटील यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई झाली असताना असमाधानकारक करवसुलीबाबत शनिवारी ‘फ’ प्रभागातील लिपिक रमाकांत जोशी यांना निलंबित करण्यात आले. तर, ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागांतील प्रभागक्षेत्र अधिकारी अनुक्रमे श्वेता सिंगासने आणि स्वाती गरूड यांच्यासह अन्य १० जणांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. मागील बुधवारी ‘क’ प्रभागातील दोघांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारताना तेथील प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, लिपिक वसंत बाविस्कर, रमेशचंद्र राजपूत, शांताराम तायडे आणि वरिष्ठ लिपिक जयवंत चौधरी यांनादेखील कारणे दाखवा नोटिसा रवींद्रन यांनी बजावल्या. करवसुलीत टाळाटाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. शनिवारी रवींद्रन यांनी ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागांतील मालमत्ता करवसुलीचा आढावा घेतला. यात असमाधानकारक वसुली केल्याबाबत ‘ग’ प्रभागाचे लिपिक रमाकांत जोशी यांना महापालिका सेवेतून निलंबित केले आहे. प्रभागक्षेत्र अधिकारी गरूड आणि सिंगासने, करअधीक्षक संजय साबळे, अनिल भालेराव, करनिरीक्षक श्रीनिवास लिमये, विजय सराफ आणि लिपिक शंकर धावारे, सुनील गावकर, दिनेश वाघचौरे, नरेश म्हात्रे, प्रवीण गंभीरराव, भगवान काळण या ‘ग’ व ‘फ’ प्रभागांतील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. थकबाकी व चालू वसुली करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका जोशी यांच्यावर ठेवला आहे. (प्रतिनिधी)
केडीएमसीचे लिपिक रमाकांत जोशी निलंबित
By admin | Updated: March 21, 2017 01:43 IST