लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अतिवृष्टीचा कहर पाहता जीवित व वित्तहानी वाढताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने जिल्ह्यातील शहरांसह निवासी भागात तब्बल ६७ ठिकाणी पाणी साचले. यामुळे पाच हजार ५०० कुटुंबांचे १८ ठिकाणी सुरक्षित स्थलांतर केले. कळवा, मुंब्य्राजवळीत झोपडपट्टीच्या ठिकाणांहून शहापूरच्या कसारा येथील डोंगरमाथ्यावरील गावपाडे आदी ठिकठिकाणी होणाऱ्या भूस्खलनामुळे जीवित व वित्तहानी होत आहे. शहरातील गटारे, नदी-नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने, घरात पाणी शिरून हानी होत आहे. अशा धोक्याच्या ठिकाणांची खबरदारी घेत त्या ठिकाणी न गेलेलेच बरे असे जाणकारांकडून ऐकायला मिळत आहे.
जिल्ह्यासह कोकणातील काही गावांवर डोंगरमाथ्यावरील भूस्खलन होऊन गावपाडे दिसेनासे झाली. माणसे गाडली गेली. शहरातील ठिकठिकाणची गटारे, नाल्यांच्या प्रवाहात माणसे वाहून गेली. पर्यटनाच्या ठिकाणी जीवघेणे अपघात वाढले. धरणांखालील नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गावांना धोका संभवण्याच्या दृष्टीने सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. घाटमाथ्यासह डोंगरावरील दरडी कोसळून जिल्ह्यातील अपघात आता नकोसे झाले आहेत. या संकटांना वेळीच आवर घालण्यासाठी अतिवृष्टीदरम्यान धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आवश्यक झाले आहे. यामुळे जिवावर बेतणार नाही आणि संकट टाळण्यास मदतच होणार आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यातील शहरांमध्ये व निवासी भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये नदी-नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले होते. जिल्ह्यातील या निवासी भागांसह सखल भागांच्या ६७ ठिकाणी दिवस-रात्र एनडीआरएफ तुकड्यांनी जीव वाचविले आहेत. यामध्ये भिवंडीत, कल्याण, दिवा, टिटवाळा अंबरनाथला, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी बोटींच्या साहाय्याने रहिवाशांना सुखरूप स्थळी हलविले. रात्रभर १०० एसटी बस तैनात करून उंबरमाळी, वासिंद, खडवली परिसरातील अडकलेल्या चार हजारांहून रेल्वे प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यात आले आहे.