सदानंद नाईक, उल्हासनगरशहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालिका प्रत्येक हातपंप व बोअरवेलवर तसे सूचनाफलक लावणार असून भांडी व कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड यांनी केले आहे.उल्हासनगर महापालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीच्या लहरीपणाचा फटका पाणीपुरवठ्याला बसून शहरातील विविध विभागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ४५० हातपंप व बोअरवेल यापैकी १२५ बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या विहिरींची दुरुस्ती व डागडुजी अद्यापही केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शहरातील भूगर्भ पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात आले नसून हातपंप व बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली. ३० टक्के पाणीकपातीचा फटका शहराला बसून पाणीटंचाई भागातील नागरिक नाइलाजाने हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. हे पाणी पिण्यास वापरल्यास गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा डॉक्टर संघटनेने दिला आहे. पालिकेने अद्यापही त्या ठिकाणी ‘पिण्याअयोग्य पाणी’ असे सूचनाफलक लावले नसल्याचा आरोप सभापती यांनी केला आहे.जीन्स कारखाने परिसरात डेड वॉटर कॅम्प नं-५ गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, जयजनता कॉलनी, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरांत हजारो जीन्स वॉश कारखाने आहेत. परिसरातील बोअरवेल व हातपंपांना काळसर पाणी येत आहे. हे डेड पाणी असल्याचा आरोप तज्ज्ञ करीत आहेत. असे पाणी पिण्यासह वापरण्यास पालिकेने बंदी आणून नवीन बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.लघुपाटबंधारे विभागाला साकडेमहापालिकेकडे एमआयडीसीव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने ३० टक्कयांपेक्षा जास्त पाणीकपात करू नये, असे साकडे पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. सोनावणे यांच्याकडे घातले आहे. तसे निवेदनही दिले आहे. उल्हास नदीची पाणीपातळी कमी झाल्यास उल्हासनगरसह कल्याण, ठाणे, भिवंडी, भार्इंदर व ग्रामीण परिसरांत पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले आहे. टँकरचा घोळ कायम शहरातील टंचाईग्रस्त भागांत पालिका टँकरमार्फत पाणीपुरवठा करते. टँकर ठेकेदाराची मुदत संपून दोन वर्षे लोटले तरी पालिका नवीन निविदा काढत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. नवीन ठेकेदार नेमल्यास टँकर ठेकेदाराची मक्तेदारी संपुष्टात येऊन झोपडपट्टी भागाला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.
बोअरवेलचे पाणी आजाराला निमंत्रण
By admin | Updated: February 15, 2016 02:59 IST