लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये नियमबाह्य दुरुस्ती परवानगीच्या आड बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू आहे. मीरा रोड येथील धरती कॉम्प्लेक्स परिसरात सिल्वर क्रिस्ट, बाले हाऊस या दोन मजली इमारतीस प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी २ जूनला भेगा भरणे, प्लास्टर, रंगरंगोटीसाठी दुरुस्तीची परवानगी दिली होती. या परवानगीच्या आडून नव्याने वाढीव तळ ते तीन मजले आणि अन्य वाढीव बेकायदा बांधकाम करण्यात आले. यावर साेमवारी महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून हे बांधकाम पाडले.
लाेकमत ऑनलाईनवर ११ जुलै राेजी याबाबत छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध झाली हाेती. त्यानंतर २३ जुलैला प्रभाग अधिकाऱ्यांनी दुरुस्ती परवानगी रद्द केली हाेती. या पार्श्वभूमीवर उपायुक्त मुठे यांनी बेकायदा वाढीव बांधकाम केलेल्या तीन मजली व अन्य बांधकामावर यंत्रसामुग्रीद्वारे तोडक कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत, चंद्रकांत बोरसे, कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, योगेश भोईर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बेकायदा बांधकाम करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उपायुक्त मुठे यांनी दिले.
मीरा-भाईंदर महापालिकेत जुन्या वा कमकुवत आणि सखल भागांत पाणी भरत असल्याने दुरुस्त्या परवानग्या महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग अनेक वर्षे देत होता. या बांधकाम परवानग्या देण्यात मोठा भ्रष्टाचार व गैरप्रकार चालत असल्याचे आरोप होत होते. त्यानंतर नुकताच दुरुस्ती परवानग्या देण्याचे अधिकार आता सहा प्रभाग अधिकारी यांना देण्यात आले आहेत. दुरुस्ती परवानगीच्या आड व्यावसायिक गाळे व व्यावसायिक बांधकामधारक, निवासी नव्याने वाढीव बांधकामे करीत असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. सर्रास नव्याने बेकायदा बांधकामे केली जात आहेत. उंचीही बेकायदा वाढवली जात आहे.