ठाणे : पाऊस कमी झाला तर पाण्याची समस्या निर्माण होते, शिवाय त्याचा परिणाम वीज निर्मितीवरही होतो. त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टींग आणि सोलार उर्जेचा वापर करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले पाहिजेत. नव्या इमारतींमध्ये या दोन्ही बाबींचा कदाचित समावेश केलेला असू शकतो. परंतु ठाणे महापालिका हद्दीतील जुन्या इमारतींना या दोन्ही योजनांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात काही विशेष तरतूद करणे गरजेचे आहे. जुन्या इमारतींनीही या संकल्पां स्वीकारल्या तरच जलसंकट व ऊर्जासंकटावर मात करता येईल, असे मत रेनवॉटर हार्वेस्टींगचे अभ्यासक अजय देशमुख आणि सोलार एनर्जीचे अभ्यासक संदीप पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येत्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचना मागवल्या आहेत. ‘लोकमत’ने आपल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’च्या माध्यमातून तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करुन त्यांच्यामार्फत पाणी समस्या व ऊर्जा टंचाईवर काही उपाय सुचविले आहेत. रेनवॉटर हार्वेस्टींगचे अभ्यास अजय देशमुख यांनी सांगितले की, नव्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टींग बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा केली आहे. परंतु, ही सवलत अद्यापही देण्यात आलेली नाही. पालिकेने तातडीने त्याची अंमलबजावणी करावी. केवळ पाऊस झाला नाही तरच रेनवॉटरवर चर्चा केली जाते. परंतु केवळ चर्चा न करता ही योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन जनजागृती करणे महत्वाचे वाटते. पालिकेने २०११ पासून रेनवॉटर हार्वेस्टींग करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार नवीन प्रत्येक इमारतीला त्याचा फायदा होत आहे. परंतु जुन्या इमारती या योजनेपासून वंचित राहतांना दिसतात. त्यांना देखील या योजनेत आणण्यासाठी पालिकेने अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना देखील ही योजना लागू करुन मालमत्ता करात सवलत देणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाऊस कमी झाला की, जलविद्युत निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. मग पर्यायी वीज निर्मितीची चर्चा सुरु होते. महाराष्ट्रासारख्या लख्ख सूर्यप्रकाश कायम असलेल्या राज्यात सौर उर्जेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होते. पालिकेने या दिशेने पावले उचलली असून त्यांनी आपले मुख्य कार्यालय, गडकरी रंगायतन, कळवा रुग्णालय आदींसह इतर कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरु केला आहे. वॉटर हिटींगसाठी विजेचा अपव्यय होत असतो. त्यामुळे सोलार वॉटर हिटर सिस्टमचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत सोलार एनर्जीचे अभ्यासक संदीप पाटील यांनी व्यक्त केले. याशिवाय स्ट्रीट लाईटकरिता एलईडी दिव्यांचा वापर करताना सोलारवर चालणाऱ्या लाईटचा उपयोग होऊ शकतो. (प्रतिनिधी) सोलार एनर्जीसाठी जनजागृती हवीनव्या इमारतींना सोलार एनर्जीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी जुन्या इमारतींना देखील काही सवलती देऊन या योजनाचा लाभ दिल्यास त्याचा फायदा पालिकेला होईल. किंबहुना अन्य मार्गाने निर्माण होणाऱ्या विजेचा वापर कमी होऊन सोलारचा वापर सुरु होईल. त्याकरिता पालिकेने जनजागृती करणे गरजेचे असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. याचा वापर केल्यास वीजेची बचत होईल.
जुन्या इमारतींना सवलती द्या
By admin | Updated: March 12, 2017 02:46 IST