अंबरनाथ : रेरा या नव्या अधिनियमाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. अनेक ग्राहक हे बांधकाम व्यावसायिकांमार्फत फसवले गेले आहेत. काही अप्रामाणिक लोकांच्या चुकीच्या कामाचा फटका इतरांना बसतो. मात्र रेरामुळे प्रामाणिक बांधकाम व्यावसायिकांचा मनस्ताप होणार नाही. उलट फसवेगिरीला लगाम लावण्यास हा कायदा उपयुक्त ठरेल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता घावट यांनी अंबर संवाद कार्यक्रमात व्यक्त केला.अंबर भरारीच्या या कार्यक्र मात रविवारी संध्याकाळी येथील शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक भवनात सनदी लेखापाल देवेंद्र जैन आणि जगदीश हडप यांनी घावट यांच्याशी संवाद साधला. यावेळी घावट यांनी ‘रेरा’ कायद्यातील विकासकाची भूमिका स्पष्ट केली. विकासकाला त्याचा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याला दंड भरावा लागू शकतो. तसेच या व्यवहारात पारदर्शकता येईल, आर्थिक शिस्त लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कायद्यात व्यावसायिकांवर जशी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे त्याचप्रमाणे प्रसंगी ग्राहकावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या व्यतिरिक्त दत्ता घावट यांच्या जीवन प्रवासावरही या वेळी चर्चा झाली.या कार्यक्र माला महिला बालकल्याण समितीच्या सभापती शशिकला दोरु गडे, मंगला सारडा, घावट यांच्या मातोश्री विमल, पत्नी हर्षदा आदी उपस्थित होते.
‘रेरा’मुळे थांबणार सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:40 IST