कल्याण: येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.२७ गावांचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तेथील स्थानिकांना भेडसावत आहे. गावे केडीएमसीत समावेश होऊनही या समस्येचे निराकरण झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी वाढवून देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता शिवसेनेच्यावतीने एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढून वाढीव पाण्याची मागणी केली. यावेळी प्रकाश म्हात्रे, जयंता पाटील, उमेश पाटील आणि सुखदेव पाटील या पदाधिका-यांसह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावे पालिकेत समावेश असली तरी केडीएमसीला कारभार सुरळीत चालविण्यासाठी थोडा अवधी हवा आहे त्यामुळे एमआयडीसीने मुबलक पाणी दयावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असून पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चोवीस तास नको निदान एक ते दोन तास तरी पुरेसा पाणीपुरवठा करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वाढीव पाणी देणे हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे सध्या वाढीव पाणी देता येणार नाही.ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर थकबाकी असून देखील त्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहीती यावेळी अधिका-यांच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
पाणी टंचाईच्या निषेधार्थ एमआयडीसीवर मोर्चा
By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST