भिवंडी : सातबाराचा आॅनलाईन दाखला कधी मिळणार? याची वाट पाहत असलेल्या ग्रामस्थांना आता तलाठी देखील कार्यालयीन वेळेत भेटत नसून त्यांचे दप्तर अशासकीय व्यक्ती हाताळत असल्याच्या तक्रारी जोर धरू लागल्या आहेत.तालुक्यात तलाठी असून त्यांची कार्यालये गावागावात असल्याने ते दररोज कामावर हजर रहातात की नाही याची शहनिशा करणारी कोणतीही यंत्रणा शासनाकडे नाही. ते कार्यालयात नसल्यास तलाठ्याने कार्यालयात ठेवलेला अशासकीय व्यक्ती कार्यालयातील सर्व शासकीय कागदपत्रे हाताळून ग्रामस्थांना माहिती पुरवतो. त्यामुळे फेरफार बाबतच्या अनेक तक्रारी पोलीसांकडे झाल्या आहेत. तसेच हक्कासाठी न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत. महसूल विभागीय कार्यालयात कर्मचारी कमी असल्याचा बहाणा करीत असे अशासकीय व्यक्ती नियमीतपणे शासकीय कागदपत्रे हाताळताना दिसत आहेत. या वस्तुस्थितीची दखल घेत शासनाने महसूल कार्यालयीन कागदपत्रे आॅनलाईन करण्याची कारवाई सुरू केली परंतु हे काम बारावी शिकलेल्या तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर सोपविल्याने या कामात विलंब होत आहे. कागदपत्रांमध्ये झालेले गैरकारभार या मुळे उघडकीस येतील ही भीती त्यांना असल्याने हा विलंब जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप ग्रामिण भागातील काही नागरीकांकडून होत आहे. त्यामुळे शासनाने या प्रक्रियेसाठी विहित कालावधी जाहिर करावा अन्यथा या कामासाठी अनुभवी ठेकेदार नेमावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (प्रतिनीधी)
भिवंडीत तलाठी गायब
By admin | Updated: October 5, 2015 00:45 IST