महापालिकेला आयएएस दर्जाचे आयुक्त मिळताच शहराचे रूपडे बदलण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला समृद्धीकडे नेण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कंबर कसली असून अपुऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साथीने हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहेत. अवैध बांधकामाला बराच आळा बसला असून शून्य कचरा संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली आहे. ३६० कोटींवर गेलेली मालमत्ताकर थकबाकी वसुलीकरिता थेट मालमत्ता जप्तीचा आसूड ओढल्याने पालिकेच्या तिजोरीत खणखणाट सुरू झाला आहे. मुळात आयएएस दर्जाच्या आयुक्तांमुळे उल्हासनगर खऱ्या अर्थाने उल्हसित झाले आहे.उल्हासनगर पॅटर्नला निंबाळकर यांनी छेद दिला. येथे ‘उल्हासनगर पॅटर्न’ नव्हे तर शासनाचा नियम चालेल, याची जाणीव संबंधितांना करून दिली आहे. या महापालिकेच्या आयुक्तपदी येण्यास अनेक जण अनुत्सुक होते. मात्र, निंबाळकर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.लेटलतीफ अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला. पालिकेतील लाचखोरीला वेसण घालण्याकरिता सर्वच विभागांत सीसीटीव्ही बसवले. मालमत्ताकराची थकबाकी वसूल करण्याकरिता स्थापन केलेल्या विशेष पथकाने तब्बल २५० मालमत्ता जप्त केल्या असून ३९ मालमत्तांचे लिलाव होणार आहेत. आयुक्तांच्या या निर्णयाने धनदांडग्यांचे धाबे दणाणले. त्यातच, बड्या नोटा रद्द झाल्याने ८ कोटींची वसुली झाली. आयुक्तांच्या कारवाईने अगोदरच धास्तावलेल्यांना ते निमित्तच मिळाले. पालिकेच्या महासभेत पहिल्याच दिवशी निंबाळकर यांनी गोंधळी नगरसेवकांना तुम्ही कोणतेही प्रस्ताव मंजूर करा. माझा कोणताही विरोध नाही. तो तुमचा हक्क आहे. मात्र, कायद्यानुसार ते राबवायचे किंवा कसे, ते माझ्या हातात आहे, असे स्पष्ट करून दणका दिला. अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अवैध बांधकामे उभी राहिली आहेत. यापुढे एकही बेकायदा बांधकाम होता कामा नये, अशी तंबी त्यांनी व्यापाऱ्यांना दिली.
सुरुवात तर उत्तम झाली, आता पुढे बघू
By admin | Updated: November 14, 2016 03:53 IST