डोंबिवली : कल्याण - डोंबिवली शहरात पडलेल्या खड्ड्यांनी वाहनचालकांचे अक्षरश: कंबरडे मोडले असताना, वाहतूक कोंडीने बेजार करून सोडले आहे. सततच्या पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली असताना पावसात डांबरीकरण करू शकत नसल्याने सद्य:स्थितीला खडीकरणाचीच मात्रा वापरावी लागत आहे. पावसाने उघडीप दिली तरच डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. दरम्यान, सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावरचे खड्डे खडीकरणाने भरण्यात आले. मंगळवारीदेखील अशीच परिस्थिती राहिली, तर त्याठिकाणी डांबरीकरण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
केडीएमसीच्या रस्त्यांसह महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा संथगतीने सिमेंट काँक्रिटीकरणाची काम सुरू असलेल्या राज्य रस्ते, अथवा विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्ते असो याठिकाणी खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सोसावा लागत आहे. डांबरी रस्त्यांची दुरवस्था आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामेही संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची पातळी समान राहिलेली नाही. यात निर्माण झालेले चढ-उतार वाहनचालकांसह वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्याचबरोबर जागोजागी टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने त्याची जागा खड्ड्यांनी घेतली असून, काँक्रीटच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना जिकिरीचे होऊन बसले आहे. दोन्ही शहरांत जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी वाहनांची गती मंदावली असून, वाहतूक कोंडीचा त्रास नित्याचाच झाला आहे. याची प्रचिती ठाकुर्ली उड्डाणपुलावर रविवारी आली. याठिकाणी खड्ड्यांमुळे दुपारी तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला होता. दरम्यान, येथील खड्डे सोमवारी खडीकरणाने भरायला सुरुवात झाली असून, काही प्रमाणात का होईना वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
--------------------------------------
वाहतूक पोलिसांकडून पत्रव्यवहार
खड्ड्यांमुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची कसरत होते. ठिकठिकाणी कोंडी होत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळातही वाहतूक सुरळीत करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. खड्डे भरण्याचे काम मनपाचे असताना ते बुजविण्यासाठी काही ठिकाणी वाहतूक पोलीसही पुढाकार घेत आहेत. दरम्यान, डोंबिवली शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकाच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केडीएमसीला पत्रव्यवहार करून खड्डे डांबरीकरणाने भरण्याची विनंती केली आहे.
----
..तर डांबरीकरणाचे काम सुरू होईल
पावसाची रिपरिप सुरू असल्याने तात्पुरता उपाय म्हणून खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. परंतु पावसाने उघडीप देताच सर्वच ठिकाणचे खड्डे डांबरीकरणाने भरण्याचे काम केले जाणार आहे. दरम्यान, सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात पडलेले खड्डे खडीकरणाने भरण्यास सुरुवात झाली आहे, पावसाने उघडीप दिल्यास मंगळवारपासून डांबराने खड्डे भरले जातील.
- प्रशांत भुजबळ, उपअभियंता, केडीएमसी
---------------------------------------
फोटो आहेत