IRCTC E-Wallet : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीचे आहे. तसेच, प्रवासादरम्यान आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बहुतेक लोक प्रवासापूर्वी आपले रेल्वे तिकीट बुक करतात. यासाठी भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने रिझर्व्हेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऑफलाइन रिझर्व्हेशन तुम्हाला रेल्वे काउंटरवर जाऊन करावे लागेल. तर ऑनलाइन रिझर्व्हेशन तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकता. जर तुम्ही ऑनलाइन ट्रेनचे तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ऑनलाइन तिकिटे बुक करताना तुमचे पेमेंट फेल होणार नाही. कारण, आयआरसीटीसी ई-वॉलेट तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन बनला आहे. आयआरसीटीसी ई-वॉलेटद्वारे तिकिटे कशी बुक करता येतील? याबाबत जाणून घेऊ शकता.
आयआरसीटीसी ई-वॉलेटचे काय फायदे?जेव्हा तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुक करता. तेव्हा तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर पेमेंट गेटवे चार्ज भरावा लागेल. पण, जर तुम्ही आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला पेमेंट गेटवे चार्ज भरावा लागणार नाही. यामध्ये पेमेंट प्रोसेस इतर पेमेंट मोड्सच्या तुलनेत फास्ट आहे. म्हणजेच तुम्हाला तिकीट बुकिंगवेळी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
जर एखाद्या परिस्थितीत तुमचे तिकीट बुकिंगवेळी रद्द झाले तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुमचा परतावा तुमच्या ई-वॉलेटमध्ये लगेच जमा होतो. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून यूपीआय, पेटीएम, अॅमेझॉन पे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करु शकता. तुम्ही ते फक्त आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपवर वापरू शकता.
आयआरसीटीसी ई-वॉलेटद्वारे तिकिटे कशी बुक करावी?आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम आयआरसीटीसी वेबसाइटवर जावे लागेल आणि तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला IRCTC Exclusive सेक्शनमध्ये जाऊन eWallet चा ऑप्शन निवडावा लागेल. जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आधीच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर व्हेरिफाय झाले असेल तर तुम्हाला कोणतेही व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही.
अन्यथा तुम्हाला व्हेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला eWallet वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला टॉप अप करण्याचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही यामध्ये यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे पैसे जमा शकता. यामध्ये किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त १०००० रुपये जमा करता येतील. टॉप अप केल्यानंतर तुम्ही ट्रान्जक्शनसाठी आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरू शकता.