सोलापूर : श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरातील मुख्य गाभारा आणि योगसमाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसातही भाविकांच्या श्रद्धेत किंचितसाही फरक पडला नाही. रात्री उशिरापर्यंत मंदिर आणि परिसर भाविकांनी फुलून गेला होता. भल्या पहाटेपासून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांचे पाय घराबाहेर पडले. दुसऱ्या सोमवारचा मान म्हणून सिद्धाराम चिट्टे आणि बसलिंगप्पा जम्मा यांनी योगसमाधीस आकर्षक फुलांची सजावट केली होती. सजावटीसाठी ८०० किलो फुले लागली. त्यात ६०० किलो शेवंती आणि २०० किलो झेंडूच्या फुलांचा समावेश होता. आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेली योगसमाधी भाविकांच्या नजरेत भरत होती. पहाटे ५ वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता योगसमाधीची विधिवत पूजा करण्यात आली. योगसमाधीस सजावण्यात आलेल्या आकर्षक फुलांमुळे वातावरण टवटवीत बनले होते. सकाळी साडेदहा वाजता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आरतीचा कार्यक्रम पार पडला. आरती सोहळ्यात हजारो भाविक सामील झाले होते. सकाळच्या आरतीनंतर पुन्हा सायंकाळी ४ वाजता ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. रात्री १० वाजता शेजारतीने दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांचा समारोप झाला. शेळगी, दहिटणे, सोरेगाव, मजरेवाडी, कुमठे, होटगी, बाळे, शिवाजीनगर, केगाव या दूरवरचे भाविक पहाटे एक-दीडनंतर स्नान आटोपून घराबाहेर पडले ते पायीच. पहाटे पाच-साडेपाचपर्यंत झुंडीने भाविक श्री सिद्धेश्वर मंदिरात येताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले होते. दर्शन सुलभ व्हावे म्हणून देवस्थान पंचकमिटीने महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा केल्या होत्या. मंदिराच्या सभामंडपात भजनाचा कार्यक्रमही रंगला होता. -------------------------भाविकांच्या संख्येत वाढपहिल्या श्रावणी सोमवारी मंदिरात लक्षणीय गर्दी नव्हती. आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सुखावलेल्या भाविकांची आज मोठी गर्दी होती. दर्शनासाठी वाहनांवर आलेल्या भाविकांमुळे पोलिसांचे वाहतुकीचे नियोजनही थोडेफार कोलमडले. पार्क चौक ते सिद्धेश्वर मंदिर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एकूणच आज भाविकांची लक्षणीय संख्या पाहावयास मिळाली.
ग्रामदैवताच्या दर्शनासाठी पावसातही लागली रीघ
By admin | Updated: August 5, 2014 01:29 IST