निपाणी : कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन १५ महिने उलटले आहेत. तरीही या सरकारने कोणतीही विकासकामे राबविलेली नाहीत. विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सरकार असफल ठरले आहे. त्यामुळे राज्यात अराजकता माजली असून, मुख्यमंत्र्यांबरोबरच प्रशासनही निद्रितावस्थेत आहे. त्यांना जाब विचारून येत्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाचे पानिपत करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले.चिकोडी-सदलगा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या उमेदवारी अर्ज दाखलप्रसंगी आयोजित चिकोडीतील प्रचारसभेत जगदीश शेट्टर बोलत होते.राज्य भाजपचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी म्हणाले, खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या निवृत्तीचा काळ आता आला आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, मतदारांनी खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. मतदार बंधू-भगिनींनी प्रकाश हुक्केरी यांची घराणेशाही मुळासकट उपटून टाकावी.खासदार डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, खोटी आश्वासने देऊन, वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांना ओठांना तूप लावून प्रकाश हुक्केरी यांनी आपला स्वार्थ साधला आहे. ते पैशासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांना आताच रोखण्याशिवाय गत्यंतर नाही. उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी पाणीपुरवठा, कालवे यांसह अनेक विषयांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वराप्पा, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार शशिकला ज्वोल्ले, गोविंद कार्नोळ, व्ही. सोमण्णा, उमेश कत्ती यांनी आपल्या भाषणांत प्रकाश हुक्केरी यांच्या भ्रष्ट कारभारावर कडाडून टीका केली. सभेस मुरूगेश निराणी, श्रीकांत कुलकर्णी, सुरेश अंगडी, रमेश कत्ती, दुर्योधन ऐहोळे, धन्यकुमार गुंडे, अरुण शहापूर, सिद्धू सवदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घराणेशाहीच्या राजकारणाचे पानिपत करा
By admin | Updated: August 3, 2014 23:33 IST