राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आ. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. १९९५ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सन २०३० सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून ८१ गावांना दररोज २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली ५३४ कि.मी. लांबीची ९९ कोटी २ लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेचा तोटा टप्प्याटप्प्याने सुमारे ३४ कोटी ६० लाखांवर गेला आहे. योजनेचे वार्षिक उत्पन्न २ कोटी ५० लाख तर खर्च ६ कोटी रुपये होत आहे. २० मार्च २०२० रोजी १५ वर्षांची मुदत संपल्याने ही योजना हस्तांतरण करून घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेकडून जिल्हा परिषदेकडे पाठवला होता.
यावर आ. शहाजीबापू पाटील यांनी ही योजना एमजीपीनेच चालवावी आणि थकीत अनुदान मिळावे, यासाठी शिवसेना नेते ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून सततच्या पाठपुराव्यानंतर शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेकडे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे वरिष्ठ कार्यालयाने सांगोला कार्यालयास याबाबत अहवाल देण्यास सांगितले होते. यावर सांगोला येथील कार्यालयाने सुमारे ६० पानांचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला असून सदरची योजना ही एमजीपी सक्षमपणे चालवू शकते, असे नमूद केले आहे.
या योजनेला उर्जितावस्था मिळाली
शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत अनुदानाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडून ही योजना एमजीपीनेच चालवावी आणि थकीत अनुदान मिळावे, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक भूमिका घेतल्याचा मला सर्वस्वी आनंद झाला आहे. या योजनेला उर्जितावस्था मिळाली आहे. या योजनेपासून वंचित असलेल्या तालुक्यातील वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आ. शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.