अरुण लिगाडे■ सांगोला
सांगोला विधानसभेची निवडणूक शेतीचा पाणीप्रश्न, महागाई, भ्रष्टाचार, सुशिक्षित बेरोजगारी याच मुद्यांवर लढवली गेली. तालुक्यात पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठेला अधिक महत्त्व असल्याने निवडणुकीत मोदी लाट अगर कोणत्याही पक्षाचा प्रभाव जाणवला नाही.
आ. गणपतराव देशमुख व माजी आ. अँड. शहाजीबापू पाटील यांच्यात पारंपरिक लढत असल्याने नेहमीप्रमाणे निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळाली. या निवडणुकीत मतदारांनी आ. देशमुख यांच्यावर स्थानिक विकासकामांपेक्षा व्यक्तीनिष्ठा, संयमी नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच जाती-पातीच्या मतदारांनी मोठय़ा मताधिक्याने निवडून दिले.
त्यांच्या विजयाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हातभार लावल्यामुळे त्यांना विजयाची हॅट्ट्रिक साधता आली.
विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. दीपक साळुंखे-पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत रिपाइं , रा.स.प., भारिप बहुजन महासंघ, भीमक्रांती सामाजिक संघटना यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने आ. देशमुखांचा विजय सोयीस्कर झाला.
त्यांना निवडणुकीत ९४ हजार ३७४ मते मिळाली असली तरी या विजयात धनगर, मराठा समाजासह अल्पसंख्याक समाज, व्यापारी, उद्योगपतींनी मोठी मदत केली आहे. उलट अँड. शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन ते 'एकला चलो रे'चा नारा देत निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना मिळालेली ६९ हजार मते शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विचार करण्यास लावणारी आहेत.
तालुक्यात अँड. शहाजीबापू पाटील यांना मानणारा मतदार आजही टिकून असल्याने ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्या मागचा चाहता वर्ग हटत नाही हे त्यांना मिळालेल्या मतांवरून दिसून आले.
भाजपचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांना मोदी लाटेचा कसलाही फायदा झाला नाही. सन २00९ मध्ये ते जनसुराज्य पक्षाकडून लढले, त्यावेळी त्यांना १३ हजार मते मिळाली होती. पण यंदा भाजपच्या तिकिटावर लढल्यावर त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
अपक्ष उमेदवार संभाजी आलदर यांनी प्रथमच निवडणूक लढवित साडेसात हजार मते मिळवली. त्यांच्या उमेदवारीचा आ. देशमुख यांना फटका बसेल, असे वाटले होते. मात्र आलदर यांना मिळालेल्या मतांचा अँड. शहाजीबापू यांनाच तोटा झाला आहे.
पाण्याची जबाबदारी
■ दुष्काळी तालुका अशी ओळख कायमस्वरूपी पुसून टाकण्याकरिता टेंभू-म्हैसाळ योजना, सांगोला उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आ. देशमुख यांच्यावर मतदारांनी पुन्हा एकदा टाकली आहे. तालुक्यातील अल्पसंख्याक, गोरगरीब मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता ऊस तोडणी व मातीकामावर जातो. यांच्यासाठी तालुक्यात कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे.
सत्तेसाठी काहीपण
■ तालुक्याचा विकास या मुद्यावर आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. अँड. शहाजीबापू पाटील यांनी महाआघाडी स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविल्या होत्या. त्यात त्यांना यशही मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत तिघांनी विकासकामाच्या मुद्यावर एकत्रित प्रचार केला होता; मात्र विधानसभा निवडणूक आ. देशमुख, अँड. पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात लढून सत्तेसाठी काहीपण.. हेच दाखवून दिले.