शिराळा : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत यंदा प्रथमच जिवंत नागांच्या अनुपस्थितीत शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी आज (शुक्रवारी) साजरी झाली. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात, चेहऱ्यावर उत्साह दाखवत शिराळकरांसह लाखो भाविक उत्सवात सहभागी झाले. तब्बल १२०० वर्षांच्या परंपरेत यावर्षी खंड पडला, तरी शिराळकरांचा संयम हे यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडण्यावर आणि त्यांची मिरवणूक काढण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमीला होणाऱ्या जिवंत नागपूजेला शिराळ्यात यावर्षी बगल दिली गेली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासनाने चोख तयारी ठेवली होती. आज सकाळी साडेसहापासून नागाची प्रतीकात्मक मूर्ती, प्रतिमा वाजत-गाजत ग्रामदैवत अंबामातेच्या दर्शनाला नेण्यासाठी नागमंडळांच्या कार्यकर्त्यांनी रांग लागली होती. दरवर्षी हातात नागाची गाडगी असणारे कार्यकर्ते यावेळी मोकळ्या हाताने मंदिराच्या आवारात बसलेले दिसत होते. दुपारी दोनच्यादरम्यान प्रमोद महाजन, सुनील महाजन, सुमंत महाजन, वैजनाथ महाजन, डी. आर. महाजन, रामचंद्र महाजन या महाजन कुटुंबियांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन, आरती झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पालखी आल्यावर दुपारी अडीचच्यादरम्यान मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत प्रत्येक नागराज मंडळाने ट्रॅक्टरमध्ये नागाची प्रतीकात्मक मूर्ती, प्रतिमा ठेवल्या होत्या. ट्रॅक्टरपुढे डॉल्बी, बेंजो, बॅण्डपथके होती. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात नागमंडळांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. यावेळी मानाच्या पालखीपुढे मानाच्या जिवंत नागाऐवजी मातीचा नाग कोतवालांनी हातात धरला होता. मिरवणूक गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, लक्ष्मी चौक, मेन रोड या मार्गावरून अंबामाता मंदिरापर्यंत नेण्यात आली. मिरवणूक रात्री दहापर्यंत सुरू होती. उत्सवासाठी लाखो भाविकांची उपस्थिती होती. मात्र जिवंत नागांच्या दर्शनाअभावी भाविक, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. जिवंत नागाची पूजा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ग्रामस्थ ग्रामदेवतेस साकडे घालत होते. अंबामाता मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. (वार्ताहर)
जिवंत नागांविनाच शिराळ्यात पंचमी
By admin | Updated: August 1, 2014 23:24 IST