सोलापूर, दि. 28 - पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही गावात पैसा देत नाही; पण जलसंधारणासाठी प्रत्येक माणसाला श्रमदान करण्यास प्रेरित करून त्याला उभा करण्याचे काम मात्र आम्ही करीत आहोत, असे पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी यांनी आज येथे स्पष्ट केले.डॉ. पोळ यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी आज ते येथे आले आहेत. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, समाजाला ज्ञानी करण्याचा पाणी फाऊंडेशनचा उद्देश आहे. जलसंधारणासंदर्भातील कामे पूर्वी यंत्राच्या सहाय्याने केली जायची; पण आम्ही यंत्राला दूर केलं आणि श्रमदानाला महत्त्व दिले. श्रमदान नसल्याने आत्मियता नसायची. आता गावागावातील कामे प्रत्येक गावक-याचे श्रम घेऊनच पूर्ण होत असल्यामुळे या कामांमध्ये आता आत्मियता आली आहे.सध्या ‘काडी कचरामुक्त शिवार’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतातील कचरा आणि काड्या फेकून देण्याऐवजी त्या मातीत पुरून टाकण्यासाठी जनजागरण केले जात आहे. गांढूळ खताचा वापरही मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी शेतक-यांना प्रवृत्त केले जात आहे. यामुळे जमिनीचा पोत वाढण्याला मदत होते, असे ते म्हणाले.
पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी यंदा 60 तालुके निवडले होते; पण पुढील वर्षी ही संख्या आम्ही 90 तालुक्यांपर्यंत नेणार आहोत. तालुका निवडताना आम्ही गावामध्ये सहा-सहा महिने पाहणी करतो. यासाठी स्वतंत्र पथक आहे. गावात पाणी या विषयावर ग्रामसभा घेतली जाते. या ग्रामसभेला एकूण लोकसंख्येच्या किती लोक येतात. पाण्याविषयी त्यांना किती आत्मियता आहे. त्यांची श्रमदान करण्याची इच्छाशक्ती आहे का? हे तपासून पाहूनच गावाची निवड केली जात असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले.