एकनाथ पाटील -- कोल्हापूर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षम व्हावे, यासाठी रात्रपाळीत काम करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांना ‘गुड मॉर्निंग’ म्हणत ड्युटीचा चार्ज देतील. जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस ठाण्यांतील कामकाज ढिम्म पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी हा उपक्रम राबविला आहे. दरम्यान, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी शहरातील चारही पोलीस ठाण्यांना कामांत सुधारणा करण्याबरोबरच ठाणे अंमलदारांच्या जबाबदारीची जाणीव करणारे लेखी आदेशाचे पत्र पाठविले आहे. त्या आदेशाची प्रत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर लावली आहे. जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्याचा कार्यभार ठाणे अंमलदार सांभाळत असतात. पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक हा फक्त पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. परंतु तक्रार असो किंवा गुन्हा हा स्टेशन डायरीवर दाखल करण्याचे काम ठाणे अंमलदार करत असतात. त्यांची माहिती बिनतारी संदेशाद्वारे पोलीस उपअधीक्षक, अधीक्षकांना कळविली जाते. परंतु बहुतांशी पोलीस ठाण्यांचे कामकाज ढिम्म पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पोलिसांच्यात समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी तसेच पोलीस ठाण्यांचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षम चालावे, यासाठी ‘गुड मॉर्निंग’चा संदेशची संकल्पना पुढे आणली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांच्यात उत्साह आणण्याचा प्रयत्न आहे. दिवस किंवा रात्री अधिकारी व पोलीस हे मोटारसायकल किंवा पोलीस जीपमधून हद्दीमध्ये पेट्रोलिंग करताना दिसतात. गाडीतून पेट्रोलिंग करण्यावर आता बंदी घातली असून दिवस अधिकारी हे दररोज तीन तर रात्र अधिकारी पाच तास पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत पेट्रोलिंग करतील. तत्काळ कारवाई अदखलपात्र गुन्ह्यामधील आरोपीस तत्काळ पोलीस ठाण्यात बोलावून सी.आर.पी. सी. १४९ प्रमाणे नोटीस द्यावी किंवा गरज पडल्यास सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. ४पोलीस ठाण्यांमध्ये जबाबदार अधिकारी असावा, तक्रार दाखल होताच तत्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याचे कामकाज दोन वेळेत करण्यात आले आहे. ४यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे दोन कर्तव्य अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांची सकाळी ९ ते रात्री ९ व रात्री ९ ते सकाळी ९ अशी ड्युटीची वेळ ठेवण्यात आली आहे. रात्री ड्युटीवर असणारे अधिकारी व कर्मचारी सकाळी ‘गुड मॉर्निंग’चा संदेश देतील. ४ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावताना २४ तासांत आलेले फोन, दाखल झालेले गुन्हे, अदखपात्र, मिसिंग, मयत, मोटार अपघात तसेच हद्दीत निघणारे मोर्चे व कार्यक्रमांची माहिती गोपनीय कर्मचाऱ्यांकडून घेऊन त्याचा रिपोर्ट तत्काळ सकाळी अकरापर्यंत द्यावा. ४तक्रार देण्यास येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. दिवसभरात दाखल होणाऱ्या तक्रारींची माहिती वरिष्ठांना देऊन गुन्हा दाखल करून त्याचा तपास स्वत: किंवा मदतनीस यांच्याकडे द्यावा. कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी, पारदर्शक काम बनावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना शहराची चांगली ओळख असल्याने त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक
‘गुड मॉर्निंग’ने पोलिसांत उत्साह -: पोलीस ठाण्याचे कामकाज होणार पारदर्शक
By admin | Updated: August 4, 2014 00:30 IST