करमाळा : सरत्या वर्षी पडलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील आठ लघू व मध्यम प्रकल्प, ४९ गावतलाव आणि ९० टक्के विहिरींत आजही पुरेसा पाणीसाठा आहे. भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पिकांना पाणी मिळाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. शेतात बहरलेली पिके पाहून ‘यंदा ज्वारी, हरभरा बक्कळ पिकणार
करमाळा तालुक्यासह जिल्ह्यात ज्वारीचे पीक बहारदार आले आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. करमाळा, मंगळवेढा, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे तालुके पांढऱ्याशुभ्र, टपोऱ्या मालदांडी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. करमाळा तालुक्यातून भीमा व सीना या दोन प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांकाठची शिवारे काळ्या, कसदार मातीची आहेत.
मागील पावसाळ्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतातील तालींमध्ये पाणीसाठा झाला. सततच्या पावसामुळे वाफसा न आल्याने पेरणी उशिरा झाली. त्यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. बारमाही कोरड्या नद्यांनाही महापूर आला. अकरा वर्षांनंतर मांगी मध्यम प्रकल्प व सीना-कोळगाचा प्रकल्प ओसंडून वाहिला. एरव्ही याच दिवसांत उणे पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात यंदा मात्र शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. परिणामत: ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमात वाढली आहेत. सध्या ज्वारीचे पीक कुठे पोटऱ्यात निसवले आहे तर कुठे हुरड्यात आहे. ज्वारीच्या कणसांवरील हुरड्यात आलेल्या ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांवर पक्षी ताव मारत आहेत.
फोटो : १२ करमाळा ज्वारी
करमाळा तालुक्यातील रोशेवाडी शिवारात आलेल्या बहारदार ज्वारीचे पीक.