शिवानंद फुलारी■ अक्कलकोट
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस व मनसे असा तिरंगी सामना झाला. मोदी लाट, मनसेमुळे काँग्रेसमध्ये मतविभागणी होणार असे गणित मांडून भाजपने निवडणूक लढवली; मात्र हे बेरजेचे गणित चुकले. शिवाय, अतिआत्मविश्वासही नडला, त्यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात ११ उमेदवार असले तरी खरी लढत भाजप, काँग्रेस व मनसे यांच्यात झाली. संपूर्ण मतदारसंघात मोदी लाट फारशी जाणवली नाही.
मनसेचे उमेदवार फारुख शाब्दी हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी होईल, असे भाजपला वाटले. त्यामुळे भाजप सुस्त राहिला आणि पराभव पत्करावा लागला.
याउलट काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी सुरुवातीपासूनच वाटेत कितीही काटे असले तरी त्यावर मात करीत एकाकी खिंड लढवली. नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळेच त्यांचा विजय सुकर झाला. गेल्या पाच वर्षांमध्ये बोरामणी, कुंभारी भागात सर्वाधिक आमदार निधी खर्च केला असला तरी २00९ च्या निवडणुकीपेक्षा भाजपला या निवडणुकीत कमी मते मिळाली, त्याचा फटका बसला.
भाजपला अक्कलकोट, तडवळ भाग वगळता अन्य ठिकाणी आवश्यक तितके मताधिक्य मिळाले नाही. चपळगाव, वागदरी गटात भाजपचे प्राबल्य असताना, हन्नूर वगळता मोठे मताधिक्य घेता आले नाही; मात्र या भागात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली.
नागणसूर, मैंदर्गी भागात अपक्ष उमेदवार महिबूब मुल्ला, मनसेमुळे मतांची विभागणी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे काँग्रेसची सरशी झाली.
दुधनी शहर व ग्रामीण भागात काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाले. माजी आ. महादेवराव पाटील यांना काँग्रेसजनांनी जवळीक साधून फारसा फायदा झाला नाही. एकेकाळी किंगमेकर ठरलेले, तीन पिढय़ा राजकारणात सक्रिय असलेले महादेव पाटील यांना त्यांच्या गावातही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मते मिळाली नाहीत.
राष्ट्रवादीला मिळालेली मते पाहता या पक्षाचे तालुक्यातील भवितव्य कठीण आहे, असे दिसते.
बाहेर असलेले मतदार खेचून आणण्यात भाजपला फारसे यश आले नाही.
■ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, बसपा, एआयएमआयएम, राष्ट्रवादी या पक्षांसह अपक्ष महिबूब मुल्ला, गुरुसिद्धप्पा प्रचंडे, संजय घोडके, सूर्यप्रकाश कोरे यांचे डिपॉझिट जप्त झाले. यांना मतदान केंद्रावर पोलिंग एजंटसुद्धा मिळाले नाहीत.
मनसेची झुंज
■ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रथमच मनसेतर्फे उमेदवारी घेऊन फारुख शाब्दी यांनी एकाकी झुंज दिली. फारुख शाब्दी यांचा राजकीय अनुभव, एकाही स्टार प्रचारकाची सभा नाही. केवळ हायटेक प्रचाराच्या जोरावर मकबूल शाब्दी व फारुख शाब्दी या पिता-पुत्रांनी पूर्ण ताकदीनिशी खिंड लढवून तिसरा क्रमांक मिळवला.