सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बोंद्रे गल्लीतील अडीच वर्षाचा मुलगा खेळताना घरातून अचानक बेपत्ता झाला आहे. संस्कार राघवेंद्र नंदी असे या मुलाचे नाव आहे. आज (शुक्रवार) दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. संस्कारची आई संगीता या रात्री उशिरा नातेवाईकांसह सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यास आल्या होत्या.संगीता यांचे माहेर हरिपूर, तर बेळगाव सासर आहे. त्यांचे पती बेळगावातील एका फौंड्रीत नोकरीस आहेत. संगीता यांना महिन्यापूर्वी कावीळ झाली होती. पतीला पगार कमी असल्याने औषधोपचारासाठी पैसे कमी पडू लागले. यामुळे त्या हरिपुरात माहेरी आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांचा मुलगा संस्कार घरी खेळत होता. दीड वाजता संगीता यांनी त्याला जेवायला बोलाविले. तथापि तो आलाच नाही. त्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. यामुळे त्या त्याला बघण्यासाठी घरातून बाहेर आल्या. अंगणातही तो नव्हता. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. तथापि तो तिथेही नव्हता. त्याच्या शोधासाठी संपूर्ण हरिपूर गाव पालथे घालण्यात आले. सांगलीतील मुख्य बसस्थानक, रेल्वे स्टेशन यासह अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला; मात्र कोठेच सुगावा लागला नाही. रात्री उशिरा संगीता सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यास आल्या होत्या. त्यांच्यासोबत नातेवाईक मोठ्या प्रमाणात होते. लहान मुलगा हरविल्याचे सांगताना त्यांनी पोलीस ठाण्यातच आक्रोश सुरू केला. पोलिसांनी संस्कार बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. (प्रतिनिधी)पोलीस बेळगावला जाणारपोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव म्हणाले, संगीता व त्यांचा पती यांच्या कौटुंबिक कारणावरुन वाद आहे. या वादातून त्यांच्या पतीने मुलास नेले आहे का, याची प्रथम चौकशी केली जाणार आहे. तो ज्या फौंड्रीत कामाला आहे, तिथे तो आज कामावर होता का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक बेळगावला रवाना केले जाणार आहे. त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे.
अडीच वर्षाचा मुलगा हरिपूरमधून बेपत्ता
By admin | Updated: August 2, 2014 00:20 IST