वैभव साळकर - दोडामार्ग --बांदा पोलीस ठाण्याच्या कारकिर्दीपासून ते स्वतंत्ररित्या अस्तित्त्वात आलेल्या दोडामार्ग पोलीस ठाण्यापर्यंत अनेक पोलिसांची कारकीर्द तसेच गुन्हेगारांचे कारनामे पाहिलेली दोडामार्ग पोलिसांची ‘ओ.पी.’ अर्थात ‘आऊट पोस्ट’ हळूहळू ओस पडल्याचे चित्र आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्यापूर्वी पोलीस व नागरिकांनी सातत्याने गजबजणारी ही आऊट पोस्ट आता सुनीसुनी झाली आहे. या इमारतीचा उपयोग कशाकरिता होणार याचे उत्तर मात्र, कोणाकडेही नाही.दोडामार्ग शहरातील गोवा रोडवर सर्व्हे क्र. २०४/१ या क्षेत्रात केवळ ३ गुंठे जमिनीवर इमारतीच्या स्वरुपात असलेल्या या आऊट पोस्टची निर्मिती व कार्यवाही नेमकी कधीपासून झाली, त्याबाबत शहरातील काही ठराविक जणानांच माहिती आहे. सुरुवातीला या आऊट पोस्टमध्ये एक ते दोन कर्मचारी होते. त्यानंतर ते काल परवापर्यंत म्हणजे स्वंतत्र पोलीस ठाणे निर्मितीपर्यंत तीन ते चार पोलीस कर्मचारीच या आऊट पोस्ट अंतर्गत कार्यरत होते. एक हेड कॉन्स्टेबल व तीन कॉन्स्टेबल असा एकूण चारजणांचा स्टाफ या आऊट पोस्टमध्ये होता. विशेष म्हणजे या ओपी अंतर्गत दोडामार्गपासून थेट झरेबांबर, उसप, खोक्रल वगैरे गावांपर्यंत शिवाय आयी सारख्या दुर्गम भागातील गावे जोडण्यात आली होती. साहजिकच केवळ तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांना या अन्य इतर गावांत गुन्हे तसेच अन्य तत्सम कारवाईसाठी ये- जा करताना दिवस पुरत नसत. यापूर्वी या आऊट पोस्ट सभोवतालची पडीक जागा आपलीच आहे, असे छातीठोक पणे सांगणाऱ्या पोलीस यंत्रणेला या आऊट पोस्ट सभोवतालची तीन गुंठे जागा वगळता अन्य जागा नूतन पंचायत समिती कार्यालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन दिल्याने या ‘ओपीचे’ पुढे काय होईल. याचे उत्तर मात्र, सध्यातरी कोणाकडे उपलब्ध नाही. साधारणत: १९८०-१९९० या कालावधीत दारु वाहतूक करणाऱ्या दोन अॅम्बेसिडर कारना पोलिसांनी बाजारपेठेतील काही नागरिकांच्या सहाय्याने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन पकडून याच आऊट पोस्टवर आणले होते. त्यावेळी लाखो रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या त्या कारमध्ये सापडल्या होत्या. संपूर्ण आऊट पोस्टची जागा त्या बाटल्या ठेवण्यास कमी पडली होती. ती कारवाई साऱ्या शहरवासियांच्या आजही आठवणीत आहे. एवढेच नव्हे तर सिद्धीविनायक मंदिरालगतच्या वासुदेव गोवेकर यांच्या घरावर पडलेला भयानक दरोडा असो, भर गांधी चौक परिसरात घडलेले मडगांवकर खून प्रकरण असो किंवा पाणी प्रश्नावरुन छेडलेला रास्ता रोको आंदोलनात पोलीस व दोडामार्ग शहरातील नागरिक यांच्यात झालेली अभूतपूर्व धुमश्चक्री असो शिवाय अन्य चोरी, हाणामारी सारख्या प्रकारांसोबत अन्य गावागावांतील तंटे-झगडे असो या साऱ्यांशी निगडीत सर्व ‘कार्यवाही’ व ‘कारवाई’ सुद्धा या आऊट पोस्टने एका साक्षीदाराप्रमाणे पाहिली आहे.वर्दळ कमी झालीअलीकडच्या काळात ही आऊट पोस्ट पूर्णत: ओस पडल्याचे चित्र आहे. स्वंतत्ररित्या अस्तित्त्वात आलेले दोडामार्ग पोलीस ठाणे नवोदीत इमारतीमध्ये मांडण्यात आल्याने या आऊट पोस्टवरील वर्दळ आपसूकच कमी झाली.ंदारू माफियांसाठी कोठडीदोडामार्ग परिसर हा गोवा राज्याच्या सीमेला लागून असल्याने तसेच त्याकाळी पत्रादेवी पूल पूर्णत्त्वास न आल्याने मुंबई, पुणे तसेच अन्य ठिकाणची वाहतूक दोडामार्ग मार्गेच व्हायची. परिणामी त्यातून दारुचीही चोरटी वाहतूक दोडामार्गमार्गे व्हायची. अशावेळी पोलिसांकडून अनेक कारवाया होऊन दारु माफियांना या आऊट पोस्टतील तुरुंगात डांबले जायचे.उत्सुकता शिगेलाया आऊट पोस्टची केवळ आता ओळख राहिली असून भविष्यात या आऊट पोस्टचे नेमके काय होणार? याबाबत मात्र, शहरवासियांत कमालीची उत्सुकता आहे
‘आऊटपोस्ट’ इमारत वापराविना
By admin | Updated: August 22, 2014 22:57 IST