कुडाळ : कुडाळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून याठिकाणी सर्व रेल्वेंना थांबा मिळण्यासाठी तसेच येथे रेल्वेचे हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ रेल्वे संघर्ष समितीला दिले. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या, शहरालगत आणि नजीकच्या सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्लेवासीयांना उपयुक्त अशा कुडाळ रेल्वेस्थानकावर अनेक रेल्वेगाड्या न थांबता निघून जात असल्याने तसेच स्थानकावरील सोयीसुविधांच्या अभावामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय संघर्ष समितीने खासदार राऊत यांच्याकडे मांडली. यावेळी समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, अभय शिरसाट, बंड्या सावंत, संतोष शिरसाट, राजेश पडते, नीलेश तेंडुलकर, बनी नाडकर्णी, जीवन बांदेकर, जालिमसिंह पुरोहित, प्रमोद ठाकूर व कुडाळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुडाळ रेल्वेस्थानकावर सर्व कोकण रेल्वेंना थांबा मिळावा, रेल्वे हॉस्पिटल व्हावे, कुडाळसाठी सर्व गाड्यांचा स्वतंत्र तिकीट कोटा मिळावा, पूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्मवर शेड उभारावी, टीटी व स्टाफ चेजिंग पॉर्इंट व लोडींग अनलोडींग पॉर्इंट या सुविधा स्थानकात असाव्यात, यासारख्या अनेक मागण्या यावेळी निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. यावेळी खासदार राऊत यांनी, या सगळ्या मागण्या योग्य असून त्या पूर्ण झाल्यास कुडाळ रेल्वेस्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच येथील अनेक प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मागण्या तत्काळ मंजूर होण्याकरिता प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुरेश पाटील, गौरीशंकर खोत व अन्य शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेल्वेच्या हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: June 26, 2014 00:10 IST