प्रकाश कवठणकर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभासिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील माहिती फलक अद्यापही अद्ययावत नसल्याची बाब समिती सदस्य सुकन्या नरसुले यांनी उपस्थित करीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या विषयावर सखोल चर्चा होऊन याप्रकरणी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती प्रकाश कवठणकर यांनी दिले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा छत्रपती शिवाजी सभागृहात शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य सतीश सावंत, सुकन्या नरसुले, विभावरी खोत, विष्णू घाडी, स्विकृत सदस्य संजय बगळे, संतोष पाताडे, फादर लोबो, सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांच्या दर्शनी फलकावरील माहिती अद्ययावत नसल्याचा मुद्दा गतवर्षी सभापती प्रकाश कवठणकर यांनी पदभार स्विकारताच उघड केला होता. यावेळी या फलकांवर संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवावे व दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशही दिले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या पंतप्रधानांचे नाव बदलले गेले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. जिल्हा परिषद सदस्य नरसुले यांनी याकडे लक्ष वेधले. शिक्षणाधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य करून यापुढे या शाळांना भेटी देणाऱ्या केंद्रप्रमुखांचे याकडे लक्ष नसल्याने त्यांच्यावरच प्रथम कारवाईचे संकेत दिले. तर सभापतींनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले.पहिली ते पाचवीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमासाठी विज्ञान विषय इंग्रजीमधून न शिकवता तो मराठीतून शिकविण्यात येणार आहे. निमशिक्षकांपैकी ११ शिक्षकांना जुलैमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यास शासनाकडून अटकाव करण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. माध्यमिक शाळांना विज्ञान प्रदर्शनाच्या प्रवासबिलाची रक्कम यापुढे तत्काळ देण्यात यावी. रजा कालावधीत प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक येण्यासाठी संघटनांनी प्रयत्न करावेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करून घ्यावे, असेही आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)
‘त्या’ अधिकाऱ्यांवर
By admin | Updated: July 12, 2014 00:20 IST