मेहरुन नाकाडे - रत्नागिरी , कोकणात समुद्राच्या पाण्याबरोबर गोड्या पाण्यातील मासेमारी प्रचलित आहे. समुद्रामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर छाया जाधव या महिलेने धरणातील पाण्यावर सुरू केलेला पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प येथील स्थानिकांना अर्थार्जन मिळवून देणारा ठरला आहे. कोकणातील हा पहिला प्रकल्प असून, महाराष्ट्रातील सहावा प्रकल्प आहे. पाच प्रकल्प विदर्भ व अन्य जिल्ह्यात आहेत.छाया जाधव या मूळ नाखरे गावच्या. मात्र, कायमचे वास्तव्य मुंबईत. पती दीपक जाधव यांनी पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प राबविण्याचे ठरविले. त्याच दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व संपूर्ण जबाबदारी छाया यांनी पेलण्याचे ठरविले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत त्यांनी २०१२ मध्ये शासनाकडे प्रकल्प सादर केला. मान्यता मिळेपर्यंत वर्ष संपले. ‘श्री़ नवलादेवी मत्स्य सहकारी संस्था, लांजा’ची स्थापना करून त्यांनी ‘व्हेळ’ धरणातील पाण्यात तरंगते ३२ पिंजरे सोडले. पैकी ८ पिंजऱ्यात माशांची पिल्ले असून, उर्वरित २४ पिंजऱ्यांमध्ये ५०० ग्रॅम ते १ किलोपर्यंतचे मासे आहेत. यामुळे २५ तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पंगेशीस व मोनोसेस तिलापिया जातीचे मासे या पिंजऱ्यात तयार करण्यात आले आहेत. राजीव गांधी इन्स्टिट्यूट, हैद्राबाद येथून तिलापियाचे, तर कोलकाता येथून पंगेशीसचे बीज आणले. कोकणातील वातावरण माशांसाठी पोषक असून, माशांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. १५ आॅगस्टनंतर मत्स्य उत्पादन सुरू होणार आहे. संपूर्ण भारतभर तसेच परदेशातूनही माशांना मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे मार्केटिंगची चिंता नाही. सुमारे १५० ते २०० टन उत्पन्न अपेक्षित आहे. एक किलोच्या माशाला ८० ते १०० रूपये दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यानंतर माशांसाठी शीतगृह, बर्फ तयार करणारा कारखाना, तसेच मत्स्यप्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या स्थानिक युवकांना छत्तीसगड येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिलांचे बचतगट तयार करून त्यांना माशांपासून शेव, कटलेट, वेफर्स, फिंगर्स आदी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जेणेकरून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल. मत्स्यबीज पाण्यात सोडल्यानंतर सात किंवा आठ महिन्यात मासा एक किलोपर्यंत तयार होतो. त्यामुळे दीड वर्षात दोन वेळा उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.
स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशातून ‘जगन्नाथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून व्हेळ येथे पिंजरा मत्स्यशेती सुरू केली. लवकरच हर्दखळे व झापडे येथे प्रत्येकी ३२ पिंजऱ्यांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही मत्स्यशेती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कोनिया’ जातीचे मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. मत्स्य प्रकल्पासाठी लागणारे बीज, खाद्य, पिंजरे तयार करणारे पूरक उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. कोकणात उत्पादित होणाऱ्या बांबूवर प्रक्रिया करून त्याचे तरंगते पिंजरे तयार केले जाणार आहेत. तसेच येथील पाटबंधारे विभागाला विनंती करून पाणी सोडताना नियंत्रण करण्याची सूचना करण्यात आली आहे. संगमेश्वर ते राजापूरपर्यंतची धरणे मत्स्यशेतीसाठी योग्य आहेत. - छाया दीपक जाधव