सावंतवाडी : राष्ट्रवादी काँॅग्रेसचा त्याग करीत माजी आमदार केसरकर यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेले दोडामार्गचे नेते सुरेश दळवी हे पुन्हा राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली आहे. दरम्यान, दळवी स्वगृही परतणे हे दीपक केसरकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.महिन्याभरापूर्वी माजी आमदार केसरकर यांच्यासोबत दोडामार्ग राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांनी सावंतवाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुरेश दळवी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत दिले. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सावंतवाडी मतदारसंघाचा आढावा काँॅग्रेसचे प्रचारप्रमुख तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करून घेतला असून, या भेटीनंतर सुरेश दळवी शनिवारीच दोडामार्गमध्ये परतले. दळवी हे राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये पुन्हा परतणार, याची कुणकुण सावंतवाडीचे शिवसेना उमेदवार केसरकरांना लागताच त्यांनीही दळवी यांची दोडामार्ग येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व पक्ष न सोडण्याची विनंती केली. मात्र, सध्यातरी दळवी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सुरेश दळवी यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच आपण कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, या बैठकीत कार्यकर्ते जो निर्णय देतील तो निर्णय मला बांधील राहील, असे मत दळवी यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीने सावंतवाडी मतदारसंघातून तिकीट देण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश दळवी राष्ट्रवादीच्या वाटेवर
By admin | Updated: September 22, 2014 00:59 IST