श्रीकर भोसले- गुहागर -सलग लांबीच्या बाबतीत केरळमधील मरीना बीचनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुहागर चौपाटीला देशी - विदेशी पर्यटकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. पण या वाढत्या पर्यटनाबरोबरच अतिउत्साही पर्यटकांच्या समुद्रात बुडण्याच्या प्रमाणातही गेल्या काही वर्षात विलक्षण वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. ३५ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या गुहागर तालुक्यासह संपूर्ण कोकणातच समुद्र किनाऱ्यावरील या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा समन्वयकाची मोठी गरज आहे.गुहागर शहराला स्वच्छ आणि सुंदर अशी ६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील ३५ किलोमीटरचा भूभाग हा अरबी समुद्राला जोडलेला आहे. सुरुबन, नारळ, पोफळीच्या बागा आणि डोंगर उतारवर गर्द हिरवी वनराई यामुळे पर्यटकांसाठी तर हे नंदनवनच भासत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या विलक्षण वाढत आहे. वाढत्या पर्यटनबरोबरच समुद्रात बुडणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. समुद्रात बुडून गेल्या काही वर्षात सुमारे २५ तरुणांचा मृत्यू ओढवला आहे.वस्तुस्थिती पाहता पावसाळा सोडल्यास इथला समुद्रकिनारा निर्धोक आहे. आजपर्यंत घडलेल्या दुर्घटनांमध्ये १९ ते ३० वयोगटातील तरुणांचाच समावेश असलेला आढळून येतोय. कधीच न पाहिलेल्या समुद्राबद्दल विलक्षण कुतूहल आणि सवंग असा अतिउत्साह हेच या दुर्घटनांमागील मुख्य कारण म्हणावे लागेल. कारण स्थानिक ग्रामस्थ, स्टॉलधारक यांच्याकडून मिळणाऱ्या सूचना आणि किनाऱ्यावरील धोक्याचे फलक याकडे दुर्लक्ष करत अनेक तरुण जिवावर संकट ओढवून घेत असल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसून आलेले आहे.गुहागरसारख्या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन आपल्या मर्यादेत राहून सूचना फलक तारेचे कुंपण लावून अशा घटना थांबवण्याचे प्रयत्न करत आहे. गेली दोन वर्षे गुहागर अॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या व्यवसायातून प्रदेश तांडेल, स्वप्नील सैतवडेकर, करण मोरे, मयुरेश साखरकर, रमेश भोसले, अजय वायंगणकर या तरुणांनी जीवाची बाजी लावून अनेक पर्यटकांना बुडताना वाचवले आहे. या तत्कालीन बाबी झाल्या. पण, यावर ठोस अशी उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षी आकस्मिक निधन झालेले गुहागर येथील विश्वास खरे यांचा उल्लेख या ठिकाणी करावाच लागेल. दररोज अतिउत्साहाने समुद्रात डुंबणाऱ्या पर्यटकांना प्रेमाने, तर वेळप्रसंगी कडक भाषेत ते याबाबतीतील गांभीर्याची जाणीव करुन देत. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या वेळी सुरक्षेसाठी स्वत: पाण्यात उतरुन कुणी बुडणार नाही, याची दक्षता घेत दुर्घटनाप्रसंगी बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यासाठीही त्यांची धावपळ असे. तालुक्याला लाभलेल्या ३५ किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीवर गुहागरप्रमाणेच हेदवी, वेळणेश्वर, पालशेत, अंजनवेल, वेलदूर, असगोली, बुधल, नरवण, तवसाळ ही समुद्र किनारपट्टीची गावेदेखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हेदवी, वेळणेश्वरला तर पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथेही पर्यटकांची संख्या वाढत आहे. भविष्यात दुर्घटना रोखण्यासाठीही सर्व समुद्र पर्यटन स्थळे एकमेकांना जोडण्याची आवश्यकता आहे. समुद्रमार्गे केवळ एका बोटीने आपत्ती काळात व्यवस्था केली जाऊ शकते. त्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर ही स्थळे जोडून घडणाऱ्या दुर्घटनांचे आदान- प्रदान वेळीच झाल्यास जीवित हानी टाळता येऊ शकते. त्याचबरोबर किनाऱ्यावरही अनेक उपाययोजना शक्य आहेत. यासाठी परस्पर समन्वयाची गरज आहेच, शिवाय पर्यटकांनीही अथांग अशा सागराचा आनंद लुटताना आपल्या जीवावर बेतणार नाही, याची काळजी तर घ्यायलाच हवी. तालुक्याला लाभलेल्या ३५ किलोमीटरच्या किनारपट्टीवर अनेक पर्यटनस्थळे असल्याने तेथेही पर्यटकांची मोठी संख्या आहे. मात्र, या साऱ्यापुढे सुरक्षेचे आव्हान आहे. केरळ नंतर सर्वात लांब किनारपट्टी केरळनंतर लांब किनारपट्टी म्हणून गुहागरचा उल्लेख. उत्साही पर्यटकांना आवर कोण घालणार. ३५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय गुहागरला. पावसाळा सोडल्यास येथील समुद्रकिनारा निर्धोक. किनाऱ्यावरील सुरक्षेचे फलक पर्यटकांनी गांभिर्याने घ्यावेत. कोकणात गुहागरला समुद्र पर्यटनासाठी अनेक लोक येतात. येथील समुद्रकिनारा स्वच्छ, निर्धोक आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. मात्र, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना येथील भौगोलिक स्थितीचे ज्ञान नसते. आता ते सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून होत आहे हे निश्चित.
सुरक्षा समन्वयकाची गरज
By admin | Updated: July 27, 2015 00:21 IST