सुनील गोवेकर - आरोंदा -मळेवाड गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे रुंदावत जात आहे. तसेच उन्हाळ्यात या नदीचे पाणी लवकर आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या नियोजनावर व नदीपात्राच्या दोन्ही बाजूने होणारी धूप यावर योग्य तोडगा न निघाल्यास भविष्यात शेती, तसेच बागायतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत नाही. मळेवाड गावचा विचार करता, गावातील लोकांची उपजीविका मुख्यत्वेकरून शेती व बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गावातून वाहणारी नदी हीच शेती बागायतीसाठी स्त्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नदीचा काठ दुतर्फा तुटत चालल्याने नदीच्या दुतर्फा असणाऱ्या माड बागायतीला धोका निर्माण झाला आहे. मळेवाड- भटवाडीतील काही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात या नदीला येणारे पूर हे नदीपात्र रुंदावण्याचे मुख्य कारण असले, तरी नदीपात्रात काही ठिकाणी साचलेला गाळ, तसेच नदीपात्राच्या मध्येच वाढलेली तृणयुक्त झाडी यामुळेही नदीपात्राचे काठ दुतर्फा तुटत असल्याचे दिसून येत आहे. ही तृणयुक्त असलेली झाडी व साचलेला गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असून, संबंधित विभागाकडून लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या काळात नदीपात्राच्या दुतर्फा असलेली माडबागायती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे रुंद झालेल्या नदीपात्रामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आल्याने उन्हाळ्यात पाण्याची चणचण जाणवते. मळेवाड परिसरात उन्हाळी शेतीच्या कामांना वेग आला असून, त्यादृष्टीने वाड्यांवाड्यांमधून नदीवर बंधारे बांधण्याची कामेही सुरू झाली आहेत. मळेवाड परिसरात पावसाळी शेतीच्या तुलनेत उन्हाळी शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, मिरची, नाचणी तसेच पालेभाज्या अशी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात.मळेवाडमधून वाहणारी नदी उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी शेतीसाठी भासणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच श्रमदानातून बंधारे उभारून शेतकऱ्यांमार्फत पाणी अडविले जाते व उन्हाळी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, या नदीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच पक्के बंधारेही बांधणे आवश्यक आहे. मळेवाड गावातील इतर वाड्यांच्या तुलनेत भटवाडीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतात.
मळेवाड येथे पाणी नियोजन आवश्यक
By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST