रत्नागिरी : चार प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावण्यासाठी केलेल्या प्रयत्नात रत्नारिी जिल्ह्यात शिवसेनाच पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. विजयाचा विचार केल्यास शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार विजयी झाले आहेत. मात्र मतांचा विचार केल्यास शिवसेनेची मते जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीनेही आपला मतांचा टक्का वाढवला आहे. स्वबळावर लढलेल्या भाजपनेही लाखाच्यावर मते मिळवली आहेत. काँग्रेसची अवस्था मात्र बिकटच होत चालली आहे. गेल्या निवडणुकीत ४६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले आणि या निवडणुकीत सर्वात ‘सेफ’ समजले जाणारे दापोलीतील शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव ही या निवडणुकीतील सर्वात मोठी लक्षवेधी घटना ठरली.जिल्ह्यातील पाच जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते. दापोली आणि चिपळूण मतदार संघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी, गुहागर मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप, राजापूर मतदार संघात शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी काहीशी पारंपरिक लढत झाली. केवळ रत्नागिरी मतदार संघात शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत झाली.दरवेळेप्रमाणे याहीवेळी एकाही अपक्षाला किंवा बंडखोराला दखल घेण्याजोगी मते मिळालेली नाहीत. जवळजवळ प्रत्येक मतदार संघात पहिले दोन उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्हा परिषदेने महाराष्ट्राच्या विधानसभेत तीन सदस्य दिले. भास्कर जाधव जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना आमदार झाले. सुभाष बने यांनाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ते विजयी झाले होते. या दोघांच्याही पावलांवर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनलेले विद्यमान सदस्य संजय कदम हे दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.रत्नागिरीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची पाटी कोरी राहिली आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी व भाजप यांना एकही जागा न मिळाल्याने तेथे या दोन्ही पक्षांची पाटी कोरी राहिली. दुसरा योगायोग सिंधुदुर्गात नारायण राणे पराभूत झाले, तर पुत्र नितेश विजयी झाले. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघात शेखर निकम व सदानंद चव्हाण यांच्या बाबतीत नात्याचाच योगायोग ठरला. सदानंद चव्हाण हे विजयी झाले व त्यांच्या जावयाचे मामा असलेले शेखर निकम पराभूत झाले.विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रत्नागिरीत होऊनही जिल्हाभरात भाजपला खातेही खोलता आले नाही, एवढी पक्षाची केविलवाणी स्थिती झाली आहे. काँग्रेसचाही दारूण पराभव झाला आहे.पाचही मतदारसंघात तब्बल ३१ उमेदवारांची अनामत रक्कम या निवडणुकीत जप्त झाली आहे. एकूण मतदानाच्या किमान १/८ मते मिळालेल्या उमेदवाराचीच अनामत रक्कम सुरक्षित राहाते. त्यामुळे या निवडणुकीत १/८ एवढी किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळालेल्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांमध्ये विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत आणि भाजपाचे उमेदवार बाळ माने यांचाच समावेश असल्याने उर्वरित ९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार, तर मागासवर्गीय उमेदवाराला ५ हजार अनामत जमा करावी लागते.
रत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी संमिश्र
By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST