राजापूर : तालुक्यात ४१ गावे डेंजर झोनमध्ये असून, त्यामध्ये सुमारे ५ हजार कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या कुटुंबांचे पर्यायी पुनर्वसन करण्यात येणार आहे.भौगोलिकदृष्ट्या राजापूर तालुका हा डोंगराळ असून, अलीकडच्या काळात या तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. सहा वर्षापूर्वी वडदहसोळ या गावी घरावर दरड कोसळून एका कुटुंबातील आठजण जागीच गाडले गेले होते. तेथूनच जवळ असलेला शिवणे गावचा रस्ता खचला होता. त्सुनामीच्या तडाख्यात नाटे गावातील चार-पाच मच्छिमार बेपत्ता झाले होते. त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अणुस्कुरा घाटातही अधूनमधून दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. राजापूर शहरात पुराचे पाणी घुसून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असते.त्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासनाने आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार धोपेश्वर, कोंढेतड, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, भरडीन, तुळसुंदे, यशवंतगड बांधवाडा, राजवाडीवाडा, भराडेवाडा, तिवरेवाडा, वेत्ये, धाऊलवल्ली, सोलगाव, कशेळी वरचीवाडी, कोंबे, ओणी, गोरुलेवाडी, कासारवाडी, कोंडिवळे, कोेंडवाडी, हातणकरवाडी, चिखलगाव नेरकेवाडी, सौंदळ मांजरेवाडी, ओझर तिवरे, जांभवली तुळसवडे, परटवली, वाडा पाल्ये, वडदहसोळ या गावांचा डेंजर झोनमध्ये समावेश आहे.या गावात ५ हजार कुटुंब निवास करत आहेत. पावसाळ्यात त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाने त्यांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था ठेवली आहे. त्यासाठी काही शाळांच्या इमारती राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या इमारतींमध्ये या पाच हजार कुटुंबांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्याच्या काळात होणाऱ्या आपत्तीसाठी राजापूर तहसील कार्यालयात आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. संपूर्ण तालुका प्रशासन त्यादृष्टीने सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)नियंत्रण कक्ष स्थापनराजापूर तालुका प्रशासनाचा आपत्कालीन आराखडा तयार.पुनर्वसनाच्या पर्यायी व्यवस्थेची आराखड्यात मांडणी.तालुक्यातील काही शाळांच्या इमारती राखीव.आपत्कालीन नियंत्रण कक्षही केला स्थापन.गेल्या काही वर्षात राजापूर तालुक्यात आपत्कालीन घटनांमध्ये वाढ.शिवणे, वडदहसोळ, नाटे भागात अनेक आपत्ती.
राजापुरात ४१ गावे ‘डेंजर झोन’मध्ये
By admin | Updated: June 3, 2015 23:39 IST