मेहरुन नाकाडे- रत्नागिरी -देवरूखपासून अवघ्या १९ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी गावात गेल्या तीन वर्षांपासून तंटेच नसल्यामुळे येथे तंटामुक्त समितीची स्थापना झालेली नाही. किरकोळ किंवा अंतर्गत उद्भवणारे वाद सामोपचाराने गावपातळीवरच मिटविले जात असल्याने गावात समितीची स्थापना करण्यात आलेली नाही. न्यायालयीन प्रलंबित खटले निकाली काढून गावातील वाद तडजोडीने मिटवून गावात शांतता नांदावी, यासाठी तंटामुक्त अभियान सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मिती करून गावाची वाटचाल ‘शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकचळवळीवर आधारित असलेल्या या अभियानाला पांगरी गावातील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गावाची लोकसंख्या १२५७ इतकी असून, ४४७ घरे, तर १० वाड्या आहेत. तीन शाळा असून, दोन अंगणवाड्या व एक मिनी अंगणवाडी आहे. गावामध्ये शिमगा सण सार्वजनिक, तर गणेशोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्यात येतो. गावामध्ये सुरूवातीच्या काळात ५ ते ७ दारूभट्ट्या होत्या. मात्र, दोन तरूणांचा ऐन उमेदीच्या काळात व्यसनामुळे झालेल्या निधनाचा बोध घेत गावाने महात्मा गांधी जयंतीदिवशी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेतला. गेल्या २२ वर्षापासून गावात दारूबंदी आहे. शिवाय गुटखाबंदीसुध्दा करण्यात आली आहे. गावामध्ये १९६० साली ग्रामपंचायत अस्तित्त्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत गावातील सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. लोकसभा, विधानसभा वा ग्रामपंचायतीची निवडणूक असो गावामध्ये राजकीय धुमश्चक्री होत नसल्यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण येत नाही. सणासुदीच्या कालावधीतही खास पोलीस बंदोबस्त मागवण्याची आवश्यकता भासत नाही. तीन वर्षे तंटेच नाहीत! कोणतेही सार्वजनिक कार्य असो वा वैयक्तिक, ग्रामस्थ सहभागी होत असल्याने गावामध्ये शांतता आहे. गावामध्ये जमिनीचे काही दावे होते. मात्र, सामोपचाराने ते मिटविले आहेत. गेल्या तीन वर्षात तंटेच उद्भवत नसल्यामुळे गावामध्ये तंटामुक्त समितीची स्थापना केलेली नाही. आतापर्यंत सर्वच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. - रामचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, तंटामुक्त समिती, पांगरी. गावात शंभर टक्के दारूबंदी गावात शंभर टक्के दारूबंदी, गुटखाबंदी राबविण्यात येत आहे. व्यसनामुळे होणारे परिणाम लक्षात घेता गावच्या हितार्थ निर्णय घेण्यात आला. गावातील दारूभट्ट्या बंद केल्या आहेत. ग्रामस्थ एकत्र येऊन सामोपचाराने उद्भवणारे वाद मिटवित असल्यामुळे गावात शांतता आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या तीन वर्षात तंटेच निर्माण झालेले नाहीत. - जयवंत रामचंद्र मुळ्ये, पोलीसपाटील. पोलीस प्रशासनाशिवाय उत्सव कोकणात शिमगा व गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. गणेशोत्सव घरगुती असला तरी शिमगा मात्र सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो. परंतु दोन्ही सण शांततेत साजरे करण्यात येत असल्यामुळे पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता भासत नाही. आतापर्यंत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. - राजश्री पानगले, सरपंच, पांगरी. शांततेचे श्रेय ग्रामस्थांना तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन घेतलेल्या निर्णयामुळे येथील अंतर्गत वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे शांतता हेच गावाचे वैशिष्ट्य आहे. शासकीय उपक्रमातही ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे कोणत्याही उपक्रमांची अंमलबजावणी करणे सोपे होते. - सारिका पवार, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पांगरी.
देवरूखजवळील ‘पांगरी’ ग्रामस्थांनी तंट्यांना केले हद्दपार!
By admin | Updated: January 2, 2015 00:10 IST