सुरेश बागवे - कडावल -मुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. घोरपडींचे अस्तित्व वाचविण्यासाठी वाढत्या शिकारीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे. घोरपडीचे मांस चविष्ट म्हणून तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ते औषधीही मानले जाते. त्यामुळे या प्राण्याच्या शिकारीचेही प्रमाण अधिक आहे. सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये आणि डोंगर दऱ्यांमधील बिळांमध्ये वास्तव्य करणारी ही प्रजाती मुळातच अतिशय दुर्मीळ आहे. शिकार तसेच अन्य कारणांमुळे घोरपडींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. पुढील काळात शिकारीचे प्रमाण असेच राहिल्यास प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपडींची शिकार करण्याची एक पद्धत पूर्वापारपासून प्रचलित आहे. घोरपडी प्रामुख्याने बिळांमध्ये वास्तव्य करतात. शिकारी लोक सायंकाळच्यावेळी बिळांच्या तोंडावर खुणेसाठी बोटभर लांबीच्या लहान काट्या लावतात. दुसऱ्या दिवशी पाहणी करून लावलेल्या काठ्या कुठच्या दिशेला पडल्या आहेत, यावरून घोरपड बिळात आहे की बाहेर, याचा अंदाज घेतला जातो. हा अंदाज परिपूर्ण होण्यासाठी शिकारी व्यक्तीचा अनुभव व तर्क तेवढाच महत्त्वाचा असतो. घोरपड बिळातच आहे, याची खात्री पटल्यास बिळाच्या तोंडावर आगीचा जाळ केला जातो. धूर आत गेल्यानंतर कासाविस झालेली घोरपड धडपडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बिळाच्या तोंडावरच तिला अलगद पकडले जाते. काहीवेळा धुरामुळे गुदमरून घोरपड बिळातच मृत होते. अशावेळी बिळ खोदून तिला बाहेर काढले जाते. सध्या सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात चरण्यासाठी घोरपडी आपला अधिवास सोडून माळरानावर येत आहेत. घोरपडीची चरण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. तिला स्थानिक ‘चरल’ असे म्हटले जाते. चाणाक्ष शिकाऱ्यांच्या लक्षात घोरपडीची ‘चरल’ आल्यानंतर ‘डाव’ टाकून तिला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. एखाद्या ठिकाणी घोरपड चरून गेली की, अनुभवी शिकाऱ्यांच्या ते सहज लक्षात येते. त्याअर्थी तिचा अधिवास जवळच असणार व ती उद्या येथे पुन्हा चरण्यासाठी येणार, हे पक्के हेरू न शिकारीसाठी फिल्डिंग लावली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळे ऊन पडल्यानंतर दोन-चार कु त्रे घेऊन शिकारी लोक तिचा माग काढतात. मनसोक्त चरत असलेली घोरपड दृष्टीस पडली की, कुत्रे तिला चारही बाजूंनी घेरतात व अलगदपणे टिपतात. अशा रीतीने आपला अधिवास सोडून चरण्यासाठी आलेल्या घोरपडींना जीव गमवावा लागतो. कोवळे ऊन त्यांच्या जीवावर बेतते. घोरपडीची शेपूट अतिशय विषारी असल्याचे मानले जाते. तिने आपल्या शेपटीचा प्रहार माणसाच्या बेंबीवर केल्यास तो तत्काळ गतप्राण होतो, असा समज ग्रामीण भागात असल्याने घोरपड पकडल्यानंतर प्रथम तिची शेपूट कापली जाते. माणसाच्या मोहाला आवर घालामुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही, तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपड या एका प्रजातीचे अस्तित्व पृथ्वीतलावरून नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. या पातकापासून माणसाला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला घोरपडीच्या शिकारीच्या मोहाला आवर घालावाच लागेल. यासाठी आता प्राणीमित्रांबरोबरच सजग नागरिकांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे.
घोरपडींची संख्या घटतेय
By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST