कणकवली : देशात महायुतीचे सरकार आल्यानंतर चांगले दिवस येतील असे स्वप्न जनतेला दाखविण्यात आले होते. मात्र, नवीन सरकार सत्तेत येवून एक महिना होत आला तरी हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत नाही. याऊलट जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. तर नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत व आमदार प्रमोद जठार येथील जनतेची दिशाभूल करीत असून विकासकामांबाबत फुकाचे श्रेय घेण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यानंतर दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जनतेला दाखविण्यात आलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न धूसर होत चाललेले आहे. तर खासदार राऊत व आमदार जठार जनतेची दिशाभूल करीत आहेत. १ जुलैपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात पडताळणी केंद्र सुरु होणार आहे. मात्र, केंद्रशासनाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आघाडी शासनाने याबाबतचा निर्णय घेतला असून ९ जून रोजी याबाबतचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. समुद्र किनारपट्टी संरक्षणासाठी तत्कालीन केंद्रशासनाने आचारसंहितेपूर्वीच ३५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. तसेच सागरी भागातील विविध विकासकामांसाठी ५० कोटींचा निधीही आघाडी शासनाने जाहीर केला होता. मात्र, याबाबत खासदार राऊत व आमदार जठार यांच्याकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. सी वर्ल्डबाबत जनतेची जी भूमिका असेल त्याच्या पाठीशी राहण्याचा जिल्हा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. जैतापूर येथील प्रकल्प व्हावा अशी भूमिका यापूर्वी भाजपने घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प झाल्यास नवनिर्वाचित खासदार तसेच शिवसेना आपली भूमिका काय ठेवणार? हे त्यांनी प्रथम जाहीर करावे. युतीने एन्रॉनबाबतची आपली भूमिका यापूर्वी बदलल्याचेही उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
नवनिर्वाचित खासदारांकडून जनतेची दिशाभूल : सावंत
By admin | Updated: June 27, 2014 17:55 IST